Sharad Pawar on Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या टीकेला उत्तर दिलं. मला टीका जिव्हारी लागली नाही, पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही असा टोला शरद पवारांनी अमित शाह यांना लगावला. देशात अनेकांनी गृहमंत्री म्हणून चांगल काम केलं होतं. या लोकांना कधी तडीपार करण्यात आलं नव्हतं असेही ते म्हणाले. देशाच्या गृहमंत्र्यांनी काही विधान केलं. मला वाटत त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलायला हवं, असंही पवार म्हणाले.
1978 साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, अमित शाह कुठे होते माहिती नाही
यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण हे अनेक वर्ष देशाचे गृहमंत्री होते. त्यांनी चांगल कामं केल्याचे शरद पवार म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी माझ्यावर टीका केली. पण त्यांनी थोडी माहिती घेऊन टीका केली तर बरं होईल असे शरद पवार म्हणाले. मी 1958 पासून राजकारणात प्रशासनात आहे. मी 1978 साली राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळी हे राजकारणात कुठे होते हे मला माहित नसल्याचे शरद पवार म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रीमंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील यांच्यासारखे कर्तृत्वान लोक होते. जनसंघाची पार्श्वभूमी असणाऱ्या अनेक लोकांनी त्यावेळी माझ्यासोबत काम केल्याचे पवार म्हणाले. तसेच वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन यांनी देखील त्या काळात मदत केल्याचे शरद पवार म्हणाले.
ते गुजरातमध्ये राहू शकत नव्हते त्यावेळी सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे आले होते
त्यावेळच्या काळात देखील विविध राजकीय पक्ष होते, त्यांच्यात एक प्रकारचा सुसंवाद होता असे पवार म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी हे कर्तृत्वान व्यक्ती होती असे पवार म्हणाले. भुजमधे भूकंप झाला त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी एक बैठक बोलावली होती. मी विरोधी पक्षात असताना देखील अटलबिहारी वाजपेयी यांनी मला एका समितीवर नेमलं होतं. सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली होती असे पवार म्हणाले. दरम्यान, अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या टीकेवर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते गुजरातमध्ये राहू शकत नव्हते त्यावेळी सहकार्यासाठी बाळासाहेबांकडे गेले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंबाबात केलेलं वक्तव्य भाजप किती गांभीर्यानं घेईल? असा सवाल देखील पवारांनी केला.