Balasaheb Thackeray Smarak: शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या (Balasaheb Thackeray Smarak) पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. तर दुसऱ्या टप्प्याचे काम 23 जानेवारी 2026 रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षााआधी पूर्ण करुन उद्घाटन करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र या स्मारकावरुन आता राज्याचं राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. 2022 मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर सरकार बदलले. आता 2026 मध्ये काम पूर्ण होऊन उद्घाटनवेळी जे सरकार असेल, त्याचे ते श्रेय असेल. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना सोडून सगळ्यांना उद्घाटनाला आमंत्रित करणार आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गट आक्रमक झाला आहे. आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे स्मारका संदर्भात कोणकोणत्या घडामोडी घडल्या, जाणून घ्या...


बाळासाहेब ठाकरे स्मारका संदर्भात आतापर्यंत नेमक्या काय घडामोडी घडल्या आहेत? बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी कोण आहे?


- 2012 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्यानंतर 2014 मध्ये फडणवीस सरकार आल्यावर स्मारक उभारणीसाठी समिती गठीत करण्याचा शासन निर्णय काढण्यात आला. 


- या समितीत तेव्हा कोणताही राजकीय नेता, लोकप्रतिनिधी नव्हता. 2014 मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समितीत तयार करण्यात आली.


- या स्मारकासाठी दादरमधील मुंबईच्या महापौर बंगल्याची जागेची शिफारस समितीने केली.


- सप्टेंबर 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने स्मारकासाठी विश्वस्त मंडळ म्हणजेच ट्रस्टीला मान्यता दिली. त्यानुसार फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा केली. 


- या निर्णयानुसार समितीमध्ये राजकीय नेतेही दिसू लागले. यात ठाकरे घराण्याचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांची सदस्य सचिव म्हणून तर आदित्य ठाकरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्मारकाचे आर्किटेक्ट शशिकांत प्रभू यांचाही समावेश होता. या सगळ्या सदस्यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे.


- यानंतर उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाले. पण ते मुख्यमंत्री होणार त्याच्या काही दिवस आधीच म्हणजेच 25 नोव्हेंबर 2019 ला न्यासचे आणि समितीचे अध्यक्ष म्हणून राजीनामा दिला. 


- त्यानंतर 2020 मध्ये ठाकरे सरकारने काढलेल्या शासन निर्णयानुसार ट्रस्ट  अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना करण्यात आलं. या शासन निर्णयानुसार, या समितीमध्येही सुभाष देसाई यांची सदस्य सचिव आणि शशिकांत प्रभू यांची सदस्य म्हणून पुर्ननियुक्ती करण्यात आली. ही नियुक्तीही पाच वर्षांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या समितीचे अध्यक्षपद आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे.


बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर-


शिंदे गटाच्या नेत्यांच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिंदे गट आता हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदार कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना पुन्हा रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, नोव्हेंबर 2022 मध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विधान परिषद सदस्य प्रसाद लाड यांनी स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली होती. तेव्हा मोठा वाद झाला होता. 


संबंधित बातमी:


Rohit Pawar: सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का?; रोहित पवारांचा संतप्त सवाल, म्हणाले, अजितदादांनी...