पुणे : अजित पवारांनी (Ajit Pawar) वेगळी चूल मांडल्यानंतर 83 वर्षांचे शरद पवार (Sharad Pawar) नव्याने पक्ष उभारणी करत प्रचाराला लागले आहेत. 56 वर्ष मी सुट्टी घेतली नाही, श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेल, असं शरद पवारांनी (Sharad Pawar Speech) म्हटलं आहे. काही लोक पक्ष सोडून गेले. पण, राष्ट्रवादी कुणी स्थापन केली, लोक कुणी निवडून आणले, मंत्रिपद कुणी दिली, असा सवाल शरद पवारांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बारामतीतील (Baramati News) उंडवडी येथील कार्यक्रमात शरद पवारांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.


शरद पवारांनी तुतारी फुंकली


भाषणादरम्यान शरद पवारांनी सुप्रियांच्या लग्नाची गोष्ट, कान तुटलेल्या कपातून चहाचा किस्सा सांगितला. विकासाचे काम करून घेणे हा माझा स्वभाव असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे. शरद पवार म्हणाले, गुजरात राज्याला कृषी मंत्री असताना प्रचंड मदत केली. मोदींना मला सांगितले की, मला बारामतीत यायचं आहे. ते इथं आले म्हणाले की, शरद पवारांनी मला शिकवलं. 


शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा


शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. तुम्ही विधानसभेला मतदान केलं, तर तुम्ही चुकीच्या रस्त्याला गेला. अधिक लोकांना संधी द्यायचा हा माझा हेतू. जनाई शिरसाईमध्ये लक्ष घालेन, पूर्ण कसं होत नाही बघतो. ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांनी (अजित पवारांनी) काम केलं नाही, आता मी पूर्ण करेल कारण माणसं माझी आहेत, असं म्हणत अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवारांनी त्यांना टोला लगावला आहे.


कुणी बोललं की, कारवाई करण्याची पंतप्रधानांची भूमिका


पंतप्रधानांनी आता वेगळी भूमिका घेतली, कुणी बोललं की, कारवाई करण्याची भूमिका त्यांनी घेतलीय. झारखंड, दिल्लीच्या मुख्यमंत्री यांना तुरुंगात टाकलं. ही काय लोकशाही आहे? ही हुकूमशाही आहे. हे चित्र बदललं नाही तर सत्ता मूठभर लोकांच्या हातात जाईल. जर तसे झालं तर, सत्ता भ्रष्ट होते, जास्त लोकांच्या हातात सत्ता जायला पाहिजे. ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होतेय, असं सांगितलं जाते, पण राहुल गांधी इथे येणार आहेत की मोदी? देश पातळीवर योग्य काम कसे, होईल यासाठी ही निवडणूक आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.


तुटलेल्या चहाच्या कपाची कहाणी


इथे उद्योग आले,पण घर बदललं का? पहिल्यांदा चहा पितळीत मिळवायचा, परत कान तुटलेला कप आला. त्यानंतर परिस्थिती बदलली, पूर्वी किल्टन बसायला टाकायचे, आता राहणीमान बदललं आहे. त्याचे कारण इथे कामं झाली आहेत. 


सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा किस्सा


शरद पवारांनी यावेळी मुलगी सुप्रिया सुळे यांच्या लग्नातील किस्सा सांगितला. सर्वांनी सुप्रिया यांचं लग्नकार्य आपल्या मुलीचं कार्य असल्याप्रकारे केलं असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी ते म्हणाले की, सुप्रियाचं लग्न झालं त्यावेळी सगळ्यांनी सुप्रियाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केलं, सुप्रिया माझी मुलगी आहे, असं सर्वांना वाटत होतं, हे कधी मी विसरू शकत नाही.


तुतारी निशाणी अगदी लहान मुलांपर्यंत पोहोचलीय


तुतारी निशाणी सर्वत्र पोहचलेली दिसत आहे, असं पवारांनी सांगितलं. लोणावळ्यामधून येत होतो, त्यावेळी त्या घाटात ट्राफिक जाम झालं, त्यावेळी एक शाळेची बस उभे होती. पोलिसांनी माझी गाडी पुढे काढली आणि त्यानंतर मुलांनी माझ्याकडे बघितलं आणि हाताने तुतारी चिन्ह केलं. त्यावरून लक्षात येते की, लहान मुलांपर्यंत चिन्ह पोहोचलं म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, असंही शरद पवारांनी म्हटलं.


माझ्यात श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेल


विरोधकांनी सांगितले 84 वय झालं. माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलं आहे? मी थांबणार नाही. तुम्ही मला चार वेळा मुख्यमंत्री केलेलं नाही, कृषी मंत्री केलं नाही. मला 56 वर्ष झाली, मला एक सुट्टी नाही. बैल पोळ्यालाही बैलाला एक दिवस सुट्टी देता, मला एकही दिवस सुट्टी दिलेली नाही. माझ्यात श्वासात श्वास असेपर्यंत तुमच्यासाठी काम करेल, अशी ग्वाही यावेळी शरद पवारांनी दिली आहे.