मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयावर भाष्य केलं. अजित पवार यांनी साथ सोडल्यानं धक्का बसला नाही पण अस्वस्थता वाटली. अजित पवार एकटेच नाही तर त्यांच्यासोबत विधिमंडळातील 25-30 सभासद गेले. अनेकांच्या निवडणुकीच्या यशासाठी तिथं गेलो असेन, त्यांच्यासाठी भाषणं केली असतील. गेल्या पाच दहा वर्षात त्यांना ग्रुम केलं असेल, अजित पवार त्याच्यातील एक घटक असं शरद पवार म्हणाले. हे लोक सोडून जातात, विधिमंडळात ज्यांच्या विरुद्ध ते निवडून आले. ज्या भूमिकेला त्यांनी विरोध केला, तिच भूमिका घेऊन ज्यांच्याविरुद्ध लढले त्यांच्याच दारात बसले त्यामुळं अस्वस्थता वाटते. लोकांना जी कमिटमेंट केलेली आहेत, त्याच्याशी सुसंगत पावलं टाकली जात नाहीत, त्यामुळं अस्वस्थता असते, असं शरद पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं.
लोक निकाल घेतात, लोकांवर माझा विश्वास : शरद पवार
अस्वस्थता असली तरी त्याची चिंता करायची नसते, त्याच्याशी सुद्धा शेवटी मजबुतीनं उभं राहायचं असते, हिम्मत दाखवायची असते, लोकांना विश्वास दाखवायचा असतो. लोक आमच्यापेक्षा शहाणे असतात, ते कोणाचं बरोबर आहे त्यानुसार लोक निर्णय घेतात. माझ्या पुस्तकाचं नाव देखील लोक माझे सांगाती आहे, लोकांवर विश्वास दाखवायचा असतो, असं शरद पवार म्हणाले.
लाडकी बहीण योजनेबाबत शरद पवार काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या दोन टर्म झाल्या, आता तिसरी टर्म सुरु आहे, इथं येऊन कौतुक करुन गेले, त्या काळात त्यांना बहिणींचं दु:ख दिसलं नाही. उद्धव ठाकरेंचा काळ सोडता त्यांची इथं सत्ता होती, त्या काळात बहिणींचं दु:ख दिसलं नाही. रोजचं वर्तमान पत्र बघितलं तर स्त्रीयांवर अत्याचार ही बातमी नित्याचीच झालेली आहे आणि ती क्लेशदायक आहे.खऱ्या अर्थानं बहिणींना सुरक्षेची सन्मानाची गरज आहे. पैसे देऊन टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तुम्ही त्यांच्याबद्दलची आस्था दाखवत नाही, महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत, वाढलेले आहेत, असं शरद पवार म्हणाले.
लाडकी बहीण योजनेचे पैसे एक कोटी आणि अधिक महिलांना वाटल्याचं म्हणतात, अजून दोन हप्ते देतील.लाडकी बहीण योजनेचा परिणाम थोडासा होईल, फार काही होणार नाही.समाजात , लोकांच्यात, बहिणींच्या घरात बेकारी, महागाई, स्त्रीयांवरील अत्याचाराचा प्रश्न आहे.विकासाच्या बाबत भरीव कामगिरी आहे असं दिसत नाही, या गोष्टींचा बहीण विचार करेल असं दिसतं, असं शरद पवार यांनी सांगितलं.गावागावात जातो, मेळावा घेतो, बहिणींशी संवाद करतो, त्या अनेक प्रश्न प्रकर्षानं मांडतात, लाडकी बहीणचा फार परिणाम जाणावणार नाही, पैशांचा परिणाम थोडाफार होईल पण त्यांचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती नाही, असंही शरद पवार म्हणाले.
इतर बातम्या :