CM Eknath Shinde Marathi Play : दोन वर्षांनी पूर्वी मोठ्या पडद्यावर 'धर्मवीर' (Dharmaveer) हा सिनेमा आला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची गणितचं बदलली. त्यातच आता धर्मवीर-2 सिनेमाही येत्या 27 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होणार हा प्रश्न सध्या पटलावर आहे. असं सगळं असतानाच आता हेच राजकारण रंगभूमीवरही रंगणार असल्याचं पाहायला मिळणार आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आधारित 'मला काहीतरी सांगायचंय' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत या नाटकामध्ये अभिनेता संग्राम समेळ दिसणार आहे. येत्या दोनच दिवसांत या नाटकाची अधिकृत घोषणा होणार असल्याचं म्हटलं जातंय. पण सध्या हे नाटक सेन्सॉर बोर्डाकडे असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. दरम्यान हे नाटक एकपात्री असून, दीर्घांकाद्वारे एकनाथ शिंदे नेमकं काय सांगणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. 


शिंदे Vs ठाकरे गटाची लढाई आता मराठी रंगभूमीपर्यंत पोहोचली


दरम्यान सध्या आणखी एका नाटकाच्या पोस्टरची चर्चा सुरु आहे. 50 खोके एकदम ओक्के असं हे पोस्ट आहे. दरम्यान पुढे या पोस्टरवर काय ते रस्ते, काय ते खड्डे, तरीपण म्हणायचं एकदम ओक्के, असं लिहिण्यात आलं आहे. तसेच कलाकारांच्या नावाच्या इथेही, 'सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणारे..' असा आशय लिहिण्यात आला आहे.  त्यामुळे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगलेली शिंदे Vs ठाकरे गटाची लढाई आता मराठी रंगभूमीवरही पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं जातंय.




रंगभूमीवर पहिल्यांदाच राजकारणाचा अंक?


आतापर्यंत अनेक सिनेमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणाचे अनेक पडदे उघडण्यात आले आहेत. सिंहासन सिनेमापासून सुरु झालेला सिनेमांमधील राजकारणाचा प्रवास आजवर अनेक सिनेमांच्या माध्यमातून उलगडण्यात आलाय. अनेक राजकीय नेत्यांच्या जीवनावरही सिनेमे आले आहेत. पण राजकारणाच्या इतिहासात महाराष्ट्राच्या राजकारणाचा अंक कधीही रंगभूमीवर उलगडण्यात आला नव्हता.                                                                              


ही बातमी वाचा : 


All We Imagine as Light : छाया कदमची भूमिका असलेल्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड, पण भारताऐवजी 'या' देशाचे करणार प्रतिनिधीत्व