मुंबई: राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये लोकसभा जागावाटपासाठी सुरु असलेल्या चर्चेचे गुऱ्हाळ काही केल्या थांबायला तयार नाही. मविआच्या जागावाटपाची (MVA Seat Sharing) चर्चा अंतिम टप्प्यात आली अशी चर्चा असतानाच आता दररोज नव्या मागणीचे प्रस्ताव समोर येताना येताना दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचं जागावाटप नेमकं कुठपर्यंत आलं, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट विशेषत: मुंबईतील जागांसाठी आग्रही असल्याचे दिसत आहे.
आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेच्या 11 ते 12 जागा लढण्यावर ठाम असल्याच समजते. याशिवाय, मुंबईतील तीन जागांवरुन जागावाटपाची चर्चा अडली आहे. शरद पवार गट ईशान्य मुंबईची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु, ठाकरे गटही ईशान्य मुंबईच्या जागेसाठी आग्रही आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. याशिवाय, ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईची जागा सोडण्याच्या मोबदल्यात दक्षिण मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईची जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ठाकरे गटाकडून वायव्य मुंबईची जागा अमोल किर्तीकर तर दक्षिण मध्य मुंबईची जागा लढण्यासाठी अनिल देसाई इच्छूक असल्याचे समजते. मात्र, काँग्रेसचे संजय निरुपम वायव्य मुंबई मतदारसंघातून लढण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटायला तयार नाही.
मुंबईत काँग्रेसला चार जागा मिळाल्याच पाहिजेत: भाई जगताप
काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत चारपेक्षा कमी जागा लढायच्या नाहीत, असे वक्तव्य केले आहे. आपण एकट्याने लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही. इंडिया आघाडी ही गरजेची आहे. मात्र, काँग्रेस पक्ष ही आपली प्राथमिकता आहे. इतर पक्षांमध्ये फूट पडली आहे. मुंबईत आपल्याला लोकसभेच्या चार जागा मिळाल्याच पाहिजेत. आपण कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही, असे भाई जगताप यांनी सांगितले.
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन
मविआच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वत:हून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांनी या दोन्ही नेत्यांशी फोनवरुन जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेतून जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
शिंदेंच्या शिवसेनेची होणार अडचण! रामटेक लोकसभेवर भाजप नेत्यांचा डोळा