Bhiwandi News: भिवंडीतील तडीपार गुंड सुजित मधुकर पाटीलला 2017 मध्ये मकोका लावण्यात आला आणि 2022 मध्ये त्याची जामिनावर सुटका झालीय. दरम्यान त्यानंतर देखील त्याने सहा गुन्हे केले आहेत. 13 जून पासून तो तडीपार असल्याचा नारपोली पोलीस स्टेशनने सांगितलंय. असे असताना देखील त्याने 307चा गुन्हा केला असा पोलीस ठाण्यात नोंद आहे. तसेच तो जाहीरपणे कार्यक्रमात वावरतो, मात्र पोलीस त्याला अटक करत नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तो लोकांमध्ये बोलतो की मोठ्या एक ते दोन लोकांची हत्या करणार आहे.
त्यामुळे प्रशासनाला प्रश्न आहे की बीड आणि परभणी सारख्या हत्याकांडाची वाट तुम्ही बघत आहात का? भिवंडीला परभणी आणि बीड बनवायचे आहे का? असा सवाल उपस्थित करत खासदार सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) उर्फ बाळ्या मामा यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान, जर या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर मोठे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सुरेश म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी दिला आहे.
मनोज म्हात्रे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी
दरम्यान, पुढे बोलताना सुरेश म्हात्रे यांनी मनोज म्हात्रे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणीही केली आहे. भिवंडी महानगरपालिकेतील तत्कालीन काँग्रेस विरोधी पक्ष नेते मनोज म्हात्रे यांच्या 14 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या निर्घृण हत्येची पुन्हा चौकशी करण्यात यावी. हत्याकांडातील प्रमुख आरोपींनी 193 वेळा सुमित पाटील यांच्याशी संपर्क साधल्याने त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) काढण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे. तसेच या प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि सुमित पाटील यांचा संबंध असल्याचा दावा ही खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर हत्याकांडाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलीय.
बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय- सुरेश म्हात्रे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन मध्ये शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केला आहे. 2012च्या करारात 2015चा स्टॅम्प पेपर आणि 2018चा फोटो वापरल्याचे म्हात्रे यांनी सांगितलंय. तर MMRDA ने परवानगी नाकारली असून कोर्टाने या बांधकामाला बेकायदेशीर ठरवत स्टे दिला आहे. सुमित पुरुषोत्तम पाटील, देवेश पुरुषोत्तम पाटील आणि सिद्धेश कपिल पाटील यांना 20 कोटी 12 लाख मोबदला देण्यात आला होता. मात्र, 6 जून 2024 रोजी फेरमूल्यांकन करून पुन्हा 196 कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे या बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.
हे ही वाचा