Eknath Khadse: पंतप्रधान मोदींनी काम केलंय का, कोंडीत पकडणाऱ्या प्रश्नावर एकनाथ खडसेंचा सेफ गेम, म्हणाले...
Raver Loksabha: पंतप्रधान मोदींचा विषय निघताच एकनाथ खडसेंचा सेफ गेम; रावेर लोकसभेत तोडीस तोड उमेदवार देऊ, राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होईल, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. महाविकास आघाडीचे लोकसभेच्या 42 जागांवर एकमत.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन रावेरची जागा सुरक्षित केली आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. किंबहुना एकनाथ खडसे यांनी रावेरच्या (Raver Loksabha) रिंगणात उतरुच नये, यासाठीच भाजपने चपळाई दाखवत रक्षा खडसे (Raksha Khadse) यांची उमेदवारी जाहीर केल्याचेही सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मी प्रकृतीच्या कारणामुळे लोकसभा निवडणूक लढवणे टाळले, असे खडसे यांनी सांगितले. तर रोहिणी खडसे यादेखील लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जास्त इच्छूक आहेत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन भाजपने रावेरची जागा सुरक्षित केली आहे का, असा प्रश्न यावेळी एकनाथ खडसे यांना विचारण्यात आला. त्यावर खडसे यांनी म्हटले की, आता अशा अनेक कथा तयार केल्या जातील. त्यावर विश्वास ठेवू नका. उमेदवारी कोणाला द्यायची हा प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो. पण उद्या रावेर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, सामना चुरशीचा आहे.रावेरमध्ये 7 ते 8 जण इच्छुक आहेत. काही उमेदवारांची छाननी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष उमेदवाराची उद्या निवड करण्यात येईल. आम्ही तोडीस तोड उमेदवार देणार आहोत. रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकणार आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी देशात काम केलंय का? एकनाथ खडसे म्हणाले...
गेल्या काही दिवसांमध्ये गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे हे भाजप नेतृत्त्वाच्या संपर्कात असल्याचा उल्लेख अनेकवेळा केला आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये यायचे आहे. त्यासाठी खडसे थेट दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना घेतलेली सावध भूमिका चर्चेचा विषय ठरली. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशात काम केले आहे, असे भाजपचे नेते सांगतात. त्यांनी 370 कलम रद्द केले, अयोध्येतील राममंदिर बांधले. त्यामुळे राज्यात भाजपला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील, या भाजप नेत्यांच्या दाव्याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न खडसे यांना विचारण्यात आला. त्यावेळी एकनाथ खडसे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी बोलणे टाळले. खडसे यांनी म्हटले की, कोणी किती काम केले ते मला माहिती नाही. पण महाराष्ट्रातील जनतेमध्ये असंतोष आहे. मला देशाचे काही माहिती नाही. पण महाराष्ट्रात कापूस आणि सोयाबीनला भाव नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. राज्यातील असुरक्षिता वाढत आहे, अशी व्यापक टीका करत एकनाथ खडसे यांनी मोदींवर थेट बोलणे टाळले.
आणखी वाचा
नाथाभाऊ मोदी-शाहांच्या संपर्कात, भाजपमध्ये जाण्याची चर्चा; एकनाथ खडसे स्पष्टच म्हणाले...