पुणे: महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार बाकी असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष सध्या मुंबईऐवजी दिल्लीतील घडामोडींकडे लागले आहे. कारण दिल्लीत बसलेल्या शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये पडद्यामागे हा‍तमिळवणीच्या वाटाघाटी सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या एका वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचा आदर केला पाहिजे. दोन्ही पिढ्या कित्येक वर्षे आम्ही एकत्र राहतोय. मला ही वैयक्तिकरित्या वाटते की, एकत्र यावे.  याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजितदादाच घेतील. पवार साहेब यांचा काल वाढदिवस होता. कुटुंबातील सगळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते यात गैर नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे ,अशी कार्यकर्त्याची इच्छा आहे, मलाही तसेच वाटतेय. राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो. त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्र येणे योग्य ठरेल. आम्ही स्वतंत्र काम करतो, कुटुंबीयांची ताकद आहे, त्यामुळे एकत्रित यावे अस मला ही वाटते. नवीन लोकांना संधी दिली पक्षाने हे चांगले आहे. राज्यात आलेल्या विधानसभा निकालावर माझा विश्वास नाही. राज्यात एवढी नाराजी अनेक प्रश्नांवर असताना हे निकाल पटत नाही. अजितदादा भेटतील तेव्हा मी शुभेच्छा नक्की देईल, असेही सुनंदा पवार यांनी म्हटले.


अजितदादा गटाकडून सुनंदा पवारांच्या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद


दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे त्यांच्या विधानाच स्वागत करतो. रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि खासदार कोल्हे यांना राष्ट्रवादी एकत्र यावं, वाटतं का? हे आधी स्पष्ट करावं. आम्हाला वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे. तसं नसतं तर काल अजित दादा बुके घेऊन गेलेच नसते. त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्या आम्ही आमच्या मांडू.. शेवटी वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे वक्तव्य अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.



आणखी वाचा


...म्हणून शरद पवार भाजपसोबत सत्तेत जाऊ शकतात; दिल्लीतील घडामोडींमुळे चर्चांना उधाण


शरद पवार गटाच्या आमदार-खासदारांमध्ये चलबिचल, सत्तेत जाण्याच्या हालचाली, पण 'या' दोन पर्यायांमध्ये कन्फ्युजन