Sharad Pawar On Shinde-Fadnavis government: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्यातील हिंसाचाराच्या घटनांवरुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, "काही लोक जाणीवपूर्वक भेदभाव करत आहेत. राज्य सरकारने पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करावी. तर धार्मिक मुद्द्यांना सत्ताधारी प्रोत्साहित करत आहेत. तसेच कोल्हापुरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या घटनेनंतर अशांततेची परिस्थिती आहे. अशा घटनांना सत्ताधारी पक्ष प्रोत्साहित करतोय." तर सत्ताधारी पक्ष दंगलीसारख्या गोष्टीला प्रोत्साहित करतोय असेही शरद पवार म्हणाले आहेत.
बीआरएस पक्षावर प्रतिक्रिया
दरम्यान यावेळी बोलताना शरद पवारांनी राज्यात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस पक्षावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी पक्षातील अनेक नेते बीआरएस पक्षात जात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देत शरद पवार म्हणाले की, कोण बीआरएसमध्ये जात आहे, याचा आढावा घ्यावा लागेल. तसेच जे जाताय त्यांची काही चिंता करायची गरज नाही. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर जे काही करत आहे, ते करायची सर्वांची ताकद असेल असे नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.
तेलंगणाप्रमाणे पेरणीसाठी 10 हजारांची मदत?
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हजारो शेतकऱ्यांचा एक सर्व्हे करत, त्यांना तेलंगणाप्रमाणे पेरणीसाठी 10 हजारांची मदत करण्याची गरज असल्याचा अहवाल पाठवला होता. दरम्यान यावरच प्रतिकिया देतांना शरद पवार म्हणाले की, तेलंगणाची मी माहिती घेतोय. महाराष्ट्राची आणि तेलंगणाची परिस्थिती वेगळी आहे. असा निर्णय घेणं एका दिवसात शक्य होत नाही. पण तेलंगणाची योजना समजून घेऊन त्याचा विचार करायला हवा. तसेच त्यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या निर्णयामुळे आत्महत्या कमी झाल्या आहेत का? याची माहिती घ्यावी. तसेच केसीआर जे काही करत आहे, ते करायची सर्वांची ताकद असेल असे नाही.
गडकरींचं शरद पवारांनी केलं कौतुक...
दरम्यान केंद्रातील सरकारला 9 वर्षं पूर्ण झाली असून, नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील तुमचा आवडता चेहरा कोण आहे? असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारला. यावर बोलताना ते म्हणाले की, सत्तेत आल्यावर तुम्ही काहीतरी निकाल दिला पाहिजे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. ते पक्षीय दृष्टीकोन ठेवत नाही. एखादा प्रश्न सांगितला तर कोण सांगतंय यापेक्षा प्रश्न किती महत्त्वाचं आहे याकडे गडकरी यांचे लक्ष असतं. तर ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. पण हा अनुभव फक्त त्यांच्याबद्दलच आहे, असेही शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: