Kolhapur News: कोल्हापुरात (Kolhapur Police) लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे हद्दीत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात अनपेक्षित घटना घडल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे. 


आक्षेपार्ह स्टेटस लावण्यावरुन निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नानंतर त्या संदर्भातील अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मंगळवारी (6 जून) रात्री देण्यात आला. पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अहवालानुसार अप्पर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी मंगळवारी सायंकाळी ते 19 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. 


यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे याला बंदी असेल. तसेच आदेशानुसार शस्त्रे, बंदूक, सोटा, तलवारी, भाले, सुरा अगर काठी किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशा कोणत्या वस्तू बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्र किंवा क्षेपणास्त्र सोडवण्याची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीची अथवा प्रेते किंवा आकृत्या त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन, जाहीरपणे घोषणा, गाणी म्हणणे, वाद्ये वाजवणे, ज्यामुळे सभ्यता अथवा नीतिमत्तेला धोका पोहोचेल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी भाषणे करणे, हावभाव करणे याला बंदी असेल. 


कोल्हापुरात आज बंदची हाक 


दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या या प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज (7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमणार आहेत. शिवाजी चौकात एकत्र आल्यानंतर महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करुन ध्येय मंत्र म्हटला जाणार आहे. यानंतर शहरातील बाजारपेठांमधून मोर्चा काढून बंदचे आवाहन करण्यात येणार आहे, तरी सर्वानी शिस्तीचे पालन करावे, कोणालाही दमदाटी करु नये, आक्षेपार्ह घोषणा देऊ नये, हात जोडून व्यवहार बंद करण्यासी विनंती करावी, असे आवाहन बंडा साळोखे यांनी केलं आहे. 


तर कारवाई होणारच, पोलीस अधीक्षकांचा इशारा 


दरम्यान, पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणत्याही ओळखीची गरज नाही, तक्रार घेतली नसल्यास त्याचे उत्तरदायित्व माझे असेल. जो कायदा मोडेल, त्याच्यावर कारवाई होणारच, कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद मागे घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या