Ajit Pawar Meets Sharad Pawar : आज (दि. 12) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस (Sharad Pawar Birthday) आहे. या निमित्त त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवारांची भेट घेणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. आज दोघेही दिल्लीत असून अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), पार्थ पवार (Parth Pawar), प्रफुल्ल पटेल (Praful Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह अजित पवार गटाचे प्रमुख नेते शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी 6 जनपथवर पोहोचले आहेत. या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय भूमिकेत काही बदल होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली होती. अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाले. अजित पवारांसोबत 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली होती. यानंतर शरद पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह हिरावलं गेलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले होते. शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात सामना रंगला. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र विधानसभेत अजित पवारांनी बाजी मारली. पवार कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका-टीप्पणी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पवार कुटुंबात कटुता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी घेतली भेट
तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पवार कुटुंबीय एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवरून खास शुभेच्छा दिल्या. यानंतर अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीत काका-पुतण्यामध्ये काय चर्चा होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या भेटीनंतर पवार कुटुंबियातील कटुता दूर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?