सातारा : आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवाच्या खोलात गेलो नाही मात्र ही निवडणूक शिंदे यांनी अधिक गांभीर्यानं घेणं अपेक्षित होतं, असं राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार म्हणाले. सरकारी संस्थाच्या निवडणुका पक्ष घेत नसतो, तरुण मुलं आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी मिळावी अशी मतदारांची इच्छा असणार असंही ते म्हणाले. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


सातारा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे  (Dnyandev Ranjane) यांनी त्यांचा पराभव केला. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे.  


एका मताने पराभव झालेल्या आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक केली. या दगडफेक प्रकरणी शशिकांत शिंदे यांनी माफी मागितली आहे. 


एसटी बाबत शेजारच्या राज्याच्या वेतनाचा अभ्यास करावा
ST कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही. याबाबत सरकारसोबत आंदोलक कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींची बैठक सुरु आहे. दुसरीकडे याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. एसटी आंदोलनावर बोलताना शरद पवार म्हणाले की, एसटी महामंडळाची स्थिती वाईट आहे. याआधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. एसटीबाबत सर्वसामान्यांचं मतही महत्वाचं आहे. एसटीचं विलिनीकरण केल्यावर अनेक मंडळांचं विलिनीकरण करावं लागेल, असंही पवार म्हणाले. महाराष्ट्र सरकारनं शेजारच्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा अभ्यास करावा, असंही पवार म्हणाले. विलिनीकरणाचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असल्यानं त्यावर बोलणार नाही. मात्र एसटीचा संप चर्चेतून सुटू शकतो, असंही ते म्हणाले. 


संबंधित बातम्या :