सातारा : जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर साताऱ्यात मोठी राडेबाजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवानंतर शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावर दगडफेक केली.
ज्ञानदेव रांजणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक केली. ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यालयावरही राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा फोटो आहे. याच कार्यालयावर शशिकांत शिंदे यांच्या कार्याकर्त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीनंतर साताऱ्यात तणाव पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : पराभव स्वीकारला, मी शरद पवार,अजित पवार,सुप्रिया ताई यांची माफी मागतो
शशिकांत शिंदे काय म्हणाले?
मी माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन, ज्या नेत्यांनी मला राजकीय क्षेत्रात उभं केलं, त्या पक्षाविरोधात चुकीची भूमिका घेऊ नका, ही भूमिका योग्य नाही, मी जाहीर माफी मागतो, पवारसाहेब, अजितदादा, सुप्रिया ताई यांची माफी मागतो, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांनी काही केलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पक्षाचा सच्चा कार्यकर्त्या आहे हे पवार साहेबांना माहिती आहे, एकनिष्ठ आहे, मी त्यांच्यासाठी जीव देईन, फक्त माझी एकच भूमिका असेल कार्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊ नये.
मी एका मताने पराभूत झालो, तो स्वीकारतो, माझ्यासाठी पवारसाहेब, अजितदादा यांनी प्रयत्न केलं. माझ्या पराभवामागे फार मोठं कारस्थान होतं, ते येत्या काळात समोर येईल, माझा गाफीलपणा मला नडला, त्यामुळे माझा पराभव झाला, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील दोन महत्वाच्या जिल्हा बँकांच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जाणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला आहे. शिंदेंविरोधात उभे असलेले राष्ट्रवादीचे बंडखोर ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांचा विजय झाला आहे. शशिकांत शिंदे यांना 24 मतं मिळाली असून विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना 25 मतं मिळाली आहेत. शशिकांत शिंदे यांचा पराभव हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का समजला जात आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 96 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 21 जागांसाठी ही लढत असताना यातील 11 जागा या बिनविरोध झाल्या होत्या. मात्र उर्वरीत दहा जागांसाठी झालेल्या मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर हायहोल्टेज ड्रामा पहायला मिळाला. यात माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या होम पिचवरच त्यांच्या विरोधात त्यांचाच कार्यकर्ते असलेले ज्ञानेश्वर रांजणे हे निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. या दोघांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याने तणाव निर्माण झाला होता. तसेच या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव होणार, अशा चर्चाही रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :