नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाच्यावतीनं लोकसभा निवडणुकिच्या निमित्तानं नवी मुंबईत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. बारामती आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील (Satara Lok Sabha) नवी मुंबई स्थित रहिवाशी आणि माथाडी कामगार परिवारासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नवी मुंबईतील भूमिपुत्र मैदान कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत मोठं वक्तव्य केलं. सातारा लोकसभेत कोणी उभा रहायला तयार आहे का बघा… कोण उभं राहत नसेल तर हा निष्ठावांत कार्यकर्ता उभा राहील,असं शशिकांत शिंदे म्हणाले. शशिकांत शिंदे यांनी सुप्रिया सुळे यांच्या समोरच सातारा लोकसभेत उभं राहण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार राजन विचारे, आमदार संग्राम थोपटे, विक्रमसिंह पाटणकर, हनुमंतराव पाटील, राजाभाऊ शेलार, विजयसिंह पाटणकर उपस्थित होते.


पवारसाहेबांसारखं नेतृत्त्व आमच्या पाठिमागं उभं आहे, ते आधारवड आहेत. सातारा लोकसभेबाबत ताईंना सांगितलं की, कोण लढतो की नाही बघा, नाहीतर पवारसाहेबांसाठी त्यांचा हा सैनिक उभं राहायला तयार आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले. पदापेक्षा आपला नेता जो या संग्रामात महाराष्ट्राची अस्मिता, चव्हाण साहेबांचा आणि पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्यासाठी लढत असेल तर आपल्यासारख्या सैनिकांनी त्यासाठी उभं राहायला पाहिजे, ही आपल्याला संधी निर्माण झालेली आहे, असं शशिकांत शिंदे म्हणाले. आपण महिनाभरात घरोघरी जाऊ आणि सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करुयात, असं शशिंकात शिंदे म्हणाले. 


राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी माथाडी कार्यकर्त्याला संधी द्यावी, असा विचार शरद पवार यांनी मांडला. त्यावेळी जावली तालुक्यात परिचीत नसलेला शशिंकात शिंदे माथाडी कामगार आणि मुंबईकरांच्या जोरावर आमदार झाला.  गावाच्या विकासासाठी योगदान देणारा मुंबईकर आहे. उद्याच्या निवडणुकीसाठी प्रत्येकानं एक महिना वेळ काढायचा आहे.  एक एक मावळा गावात जाऊन चित्र बदलू शकतो, असा विश्वास आपल्याला द्यायचा आहे. 


आम्ही पुण्यात बसलो होतो, त्यावेळी पक्षाच्या चिन्हाची चर्चा सुरु होती. वटवृक्ष, शिट्टी, कपबशी याबाबत चर्चा सुरु होत्या. पण नियतीच्या मनात वेगळं होतं, निवडणूक आयोगानं आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिलं, ते लगेच मतदारांपर्यंत पोहोचलं, असं शशिकांत शिंदे म्हणाले. 


माथाडी कामगारांच्या पाठीशी  शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष खंबीरपणे उभा राहिलेला आहे. माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे त्यांनी आवाहन केले.


संबंधित बातम्या : 


Sunil Tatkare on Rohit Pawar : रोहित पवार 2019 मध्येच भाजपात प्रवेश करणार होते, हडपसरमधून त्यांना उमेदवारी हवी होती, सुनील तटकरेंच्या दाव्याने खळबळ


 Prakash Ambedkar : माझं भांडण शरद पवारांसोबत आहे, सुप्रिया सुळेंसोबत नाही; शरद पवारांनी आमच्या पक्षाचं... ; काय म्हणाले प्रकाश आंबेडकर