Chandrakant Patil on Eknath Khadse : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे येत्या 15 दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज जळगावमध्ये (Jalgaon) त्यांनी भाजप प्रवेशावर वक्तव्य केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे राजकीय कट्टर विरोधक राहिलेल्या आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे भाजपमध्ये जाणार असल्याचं ते सांगत असले तरी त्यात संभ्रम आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश होत नाही तोपर्यंत प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. एकनाथ खडसे हे सक्षम नेते आहेत. राज्यातील सगळ्या जागा निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असेल. त्यांचे स्वागत नाही केले नाही तरी ते चांगले काम करतील, असा मला विश्वास आहे. खडसे हे स्टार प्रचारक आहेत आणि आता भाजपमध्ये (BJP) स्टार प्रचारक होतील, असे त्यांनी म्हटले आहे.


लोकसभेच्या सगळ्या जागा जिंकण्यासाठी खडसेंचा उपयोग होणार


खडसे यांचा आणि आपला तात्विक विरोध राहिला आहे. तो काही शेतीच्या बांधावरचा वाद नव्हता. वैयक्तिक विरोध नव्हता त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेता येईल. राज्यात लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) सगळ्या जागा जिंकण्यासाठी खडसे यांचा उपयोग होणार आहे. मी मागील काळात बरेच भोगले होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या काळात त्यांनी साथ दिल्याने कामाचं समाधान होत आहे. त्यांची अशीच साथ कायम राहील, अशी आपल्याला आशा आहे. 


रक्षा खडसेंचा प्रचार करण्याची आवश्यकता असेल तर...


रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी त्यांच्या मतदारसंघात जे काही काम केले आहे. त्यामुळे या मतदार संघात त्यांना अडचण नाही. मी काम केले नाही तरी चालणार आहे. मात्र महायुतीचा घटक असल्याने प्रचार करण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच करणार असल्याची प्रतिक्रिया खडसे परिवाराचे राजकीय विरोधक राहिलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.


रोहिणी खडसे शरद पवारांच्या भेटीला


दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघासाठी रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्या रोहिणी खडसे शरद पवारांची पुण्यात भेट घेणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत उद्या बैठक आयोजित करण्यात आली असून शरद पवार गटाकडून रक्षा खडसेंविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  


आणखी वाचा


Blog : रोहिणी खडसेंचा एक निर्णय आणि थेट भाजपलाच धोबीपछाड