Satara Lok Sabha Constituency : सातारा : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी देशभरात पाहायला मिळत आहे. अशातच राज्यात सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंकाच नाही. अशातच अद्याप महायुती आणि महाविकास आघाडीकडून काही जागांवरचा तिढा सुटलेला नाही. यापैकी एक जागा म्हणजे, साताऱ्याची. महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या जागेवर अनेक दिवसांपासून खलबतं सुरू आहे. महाविकास आघाडीकडून साताऱ्याची जागा शरद पवार गटाला देण्यात आली आहे. साताऱ्यातून शरद पवार श्रीनिवास पाटलांना लोकसभेच्या रिंगणात उतरवणार हे जवळपास निश्चत होतं. पण तब्येतीच्या कारणास्तव आपण निवडणूक लढवणार नसल्याचं श्रीनिवास पाटलांनी स्पष्ट केलं. आता सातारा लोकसभा निवडणूक कोण लढवणार? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरीतच राहिला.
लोकसभा निवडणूक लढवण्यास श्रीनिवास पाटलांनी नकार दिला आणि पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून नव्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाली. तर दुसरीकडे श्रीनिवास पाटलांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न शरद पवार गटाकडून सुरू आहे. अशातच साताऱ्याचा तिढा सोडवण्यासाठी आज सिल्वर ओकवर बैठक पार पडली. या बैठकीला सातारा लोकसभेसाठी इच्छुक शशिकांत शिंदे, सारंग पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचलेले.
श्रीनिवास पाटील यांची निवडणूक न लढण्याची भूमिका आणि त्याऐवजी आपल्या मुलाला सारंग पाटीलला उमेदवारी द्यावी, यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार श्रीनिवास पाटलांनी केल्याची माहिती मिळत आहे. तर शशिकांत शिंदे यांनी पक्षानं आदेश दिल्यास रणांगणात उतरून महायुतीच्या उमेदवारा विरोधात जोरदार लढत देण्याची तयारी असल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता साताऱ्याचा तिढा कधी सुटणार? आणि साताऱ्यातून उमेदवारी कोणाला मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.