Madha Lok Sabha Election 2024 : सोलापूर : माढा (Madha) लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांचं मुंबईतील (Mumbai News) निवासस्थान सिल्वर ओकवर जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे आता धैर्यशील मोहिते पाटील भाजपला (BJP) लवकरच 'दे धक्का' देणार हे निश्चित झाल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. 


शरद पवार आणि धैर्यशील मोहित पाटलांच्या भेटबाबत मोहिते पाटील कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, याबाबत मोहिते पाटील कुटुंबातील एकही व्यक्ती काहीच बोलण्यास तयार नाही. शरद पवारांच्या घरासमोर उभ्या असलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवत धैर्यशील मोहिते पाटलांनी ही भेट घेतल्याचं बोललं जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार आणि मोहिते पाटील यांच्यात जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी शरद पवार यांना सांगितल्या असून यावर सोमवारी 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 


काल सिल्वर ओकच्या मागील प्रवेशद्वारानं मोहिते पाटील यांनी प्रवेश घेत ही गुप्त बैठक घेतल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील यांनी ही बैठक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्यापूर्वी शरद पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित असणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांनी ही बातमी लीक केली आणि मोहिते पवार भेटीची माहिती बाहेर पडली. गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पुन्हा स्वगृही परतणार असल्याची चर्चा सुरु होती. यातच काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलते जयसिंह मोहिते पाटील यांनी आम्ही हाती तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघात उतरवणार असल्याचं सांगितल्यानं या प्रक्रियेला वेग आला होता. 


दरम्यान, सध्या मोहिते पाटील हे भाजपमध्ये असून रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. उमेदवारीसाठी इच्छुक असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजप संघटनेच्या वरिष्ठ पदावर असल्यानं या भेटीत गुप्तता पाळण्यात आली होती. 


आधी शक्तीप्रदर्शन, मग उमेदवारी जाहीर करणार 


मोहित पाटील आणि शरद पवारांच्या भेटीत माढा लोकसभा निवडणुकीबाबत खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, येत्या 13 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार असल्याचं बोललं जात असून याच दिवशी ते आपली उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.  


मोहिते पाटील यांनी 2019 मध्ये भाजपत प्रवेश करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विराट शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारी माढा लोकसभा भाजपाला जिंकून दिली होती. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर शरद पवार आणि आघाडीच्या नेत्यांसमोर मोठं शक्तिप्रदर्शन करत शेतकरी मेळावा घेण्याचं नियोजन देखील सुरु झालं आहे. मोहिते पाटील यांना करमाळा येथून माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्यासह इतर तालुक्यातूनही मोठं समर्थन मिळू लागलं आहे. आता मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय शरद पवार केव्हा जाहीर करणार? त्यानंतर या सर्व घडामोडींना वेग येणार आहे. यासाठी मोहिते पाटील कुटुंबानं पहिलं पाऊल उचलत काल भेट तर घेतली. त्यामुळे सध्याच्या चर्चांनुसार, शरद पवार यांच्या घोषणेनंतर मोहिते पाटील भाजपाला दे धक्का देणार यात काही शंकाच नाही.