बीड: बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. अशात हिवाळी अधिवेशनात देखील हे प्रकरण मोठं गाजताना दिसत आहे. अशातच आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया देताना या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून घटनेतील आरोपींना शिक्षा द्यावी असं म्हटलं आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही भांडत आहोत आम्ही राजकारणासाठी भांडत नाही, असं आमदार सुरेश धस म्हणाले आहेत. 


देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री पद घ्यावे आणि परिस्थिती हाताळावी असं बोललं जातं आहे, त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय बोलावं किंवा पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. 


हे प्रकरण गंभीर आहे. काय वातावरण आहे ते तुम्ही तपासा, परिस्थिती खूप गंभीर आहे. तोष देशमुख यांच्यासाठी सहानुभूतीची लाट आहे. जर का संतोष देशमुख गुंड असते, जर संतोष देशमुख यांच्यावर ती आधी कोणती केस दाखल असती किंवा ते काही खंडणी प्रकरणात होते का? तर नाही. असं कोणतंही प्रकरण त्यांच्या बाबतीत नाही. अतिशय सभ्य ते होते. आमच्या भारतीय जनता पार्टीचे ते बूथ प्रमुख होते. म्हणून आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या बूथ प्रमुखाची हत्या झालेली आहे, त्यामुळे आम्ही आमच्या बूथ प्रमुखांचीच बाजू घेणार आणि इतर कोणाची बाजू घेणार नाही. ज्याच्यामध्ये जे जे दोष असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी आमचा मागणी आहे, असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे. 


मुख्यमंत्र्यांचं ते वक्तव्य आमच्यासाठी खूप...


याबाबतीमध्ये आनंदाची बाब म्हणजे आज मुख्यमंत्री याबाबत सभागृहामध्ये उत्तर देणार आहेत आणि माध्यमांशी बोलताना देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, मी या प्रकरणातील कोणालाही सोडणार नाही. इतकंच वाक्य आमच्यासाठी खूप आहे, असं सुरेश धस यांनी पुढे म्हटलं आहे. 


बीडमध्ये चण्याफुटाण्यासारख्या 307 च्या केसेस


संदीप क्षीरसागर यांच्या बीडमध्ये 307 हा गुन्हा चॉकलेट खाल्ल्यासारखा आहे. याबाबत वक्तव्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, 'चॉकलेट खाल्ल्यासारखा नाही आधीच्या काळात जे बुढ्ढीचे बाल मिळायचे, तशा पद्धतीने 307 च्या केसेस किती लावल्या गेल्या याचा रेकॉर्ड काढावा. मी आमच्या बीडच्या एसपींना रेकॉर्ड मागितला आहे. चण्याफुटाण्यासारख्या 307 किती लागल्या गेल्या, त्या कशा पद्धतीने दाखल केल्यात, कोणाच्या सांगण्यावरून दाखल झाल्या आहेत. विनाकारण त्यांनीच मारायचं आणि त्यांनीच गुन्हा दाखल करायचा. नुकत्याच झालेल्या इलेक्शन मध्ये 40 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. परळी मतदारसंघांमध्ये 40 जणांवरती 307 गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 


पंकजा मुंडे यांनी कमळाच्या विरोधात काम केलंय


पंकजा मुंडे यांनी कमळाच्या विरोधात काम केलंय या वक्तव्यावर माध्यमांशी बोलताना सुरेश धस म्हणाले, मी आत्तासुद्धा ते बोलतोय. कर नाही त्याला डर कशाला. त्यांनी माझ्या मतदारसंघांमध्ये कमळ या चिन्हाचा प्रचार केलेला नाही. त्याबाबतचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्यांनी गळ्यातला गमछा काडलेला आहे, एकदा एका सभेमध्ये गमछा गळ्यात घातला तो काढून टाकला, हे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे मी त्यांनी माझ्या विरोधात काम केला आहे हे जाहीरपणे बोलतो. इतरांच्या मतदारसंघात आणि काय काम केलं आहे ते त्यांना माहिती. जे बोलत असतील त्यांनी बोलावं जे नसेल बोलत त्यांनी बोलू नये, असं माझं मत आहे, असंही ते पुढे म्हणालेत.


विष्णू चाटे अँड गँग ऑफ सफेपुर याचा आका कोण


मी या प्रकरणात कोणाचं नाव घेत नाही. मी अद्याप कोणाचे नाव घेतलेले नाही, या क्षणाला देखील मी कोणाचं नाव घेत नाहीये. मी फक्त एवढेच म्हणतोय विष्णू चाटे, सुदर्शन घोले, प्रतीक घोले, केदार आणखी तीन नाव आहेत. काल विष्णू चाटे यांना अटक केली आणखी तीन आरोपी राहिले आहेत. या विष्णू चाटे अँड गँग ऑफ सफेपुर याचा आका कोण आहे हा तपासामध्ये सापडावा एवढीच विनंती आहे, असंही धस पुढे म्हणालेत.