नागपूर : भाजपसह (BJP) सहयोगी पक्षाचे आमदार आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देत आहे. सोबतच शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या मित्रपक्षांच्या आमदारांनाही संघाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session 2024) काळात भाजपचे आमदार दरवर्षी अधिवेशन सुरू असताना एक दिवस सकाळी संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसराला भेट देतात.  यावेळी आमदार संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतात. यावेळी संघाचे पदाधिकारी आमदारांना संघाच्या कार्याची माहिती देऊन बौद्धिक मार्गदर्शनही करतात. या स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे नेते दाखल झाले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार येथे येणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Continues below advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, पंकज भोयर, धूर्वे , चित्रा वाघ, जयकुमार रावल (यवतमाळ), श्रीकांत भारतीय, शिवेंद्र राजे भोसले, संजय राठोड, गणेश नाईक, संजय उपाध्याय, उदय सामंत, गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, राम शिंदे, निलेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रताप सरनाईक, मंगलप्रभात लोढा, नीलम गोऱ्हे, संजय शिरसाट, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्वेता महाले, नितेश राणे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे आमदार स्मृती स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. 

अजित पवारांनी इथे यायलाच हवे : चित्रा वाघ

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, संघाने महायुतीसाठी काम केले आहे. फक्त भाजपसाठी किंवा शिवसेनेसाठी नाही. त्याचा लाभ भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांनी इथे यायलाच हवे, असे त्यांनी म्हटले आहे. 

Continues below advertisement

अजित पवारांना यायला काय हरकत : गुलाबराव पाटील

शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, हिंदुत्त्वाचा विचार करणारे संघटन म्हणजे संघ आहे. बाळासाहेब आणि संघाचे विचार सारखे होते. आम्हाला इथे आल्यानंतर कुठेही वेगळ्या ठिकाणी आलो असं जाणवत नाही. सर्वच पक्षांनी या ठिकाणी यायला हवं. अजित पवारांना यायला काय हरकत आहे. संघाने पडद्यामागून नाही तर पडद्यावरच भूमिका बजावली. यंदा संघाकडून व्होट जिहादला समर्पक नव्हे तर महाउत्तर देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. तर दादा भुसे म्हणाले की, संघ आणि शिवसेना वेगळे नाहीत. संघाने यंदा मोलाची भूमिका बजावली आहे. अजित पवार यांनी यायला हवे, त्यांचा पक्षाचा विचार ते करतील मात्र त्यांनी यायला हवे, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, एकनाथ शिंदे हे शिवसेना आणि भाजपच्या बऱ्याचशा आमदारांसह समाधी स्थळावरच बराच वेळापासून थांबून आहेत. ते आमदारांसोबत फोटोसेशन करत असल्याचे दिसून आले.

आणखी वाचा 

Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप