मुंबई: अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणात शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांनी 'करमचंद जासूस' म्हणून खिल्ली उडविली होती. त्यांच्या या टीकेचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला. जासूस करमचंद याने चांगली कामं केली होती. पण हा इतिहास माहिती असायला अभ्यास आणि थोडं वाचन असणे आवश्यक आहे. मात्र, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  हे गुंडांसोबत वावरत असतात, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.


उद्धव ठाकरेंना 'करमचंद जासूस' म्हणणारे एकनाथ शिंदे हे फेकूचंद आहेत. या फेकूचंदवर कोण विश्वास ठेवणार? हे गुंडांचे सरदार चोरांची टोळी चालवतात. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जासूस करमचंद म्हणताना माहिती घेऊन बोलावे. पण त्यासाठी अभ्यास आणि थोडं वाचन असावे लागते. आसपास गुंड नव्हे तर विचारवंत, बुद्धिवंत असावे लागतात. रोज चार गुंडांसोबत बैठका घेऊन बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे की, ते लेखक, साहित्यिक, कवी, विचारवंत, कवी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्त्यांना भेटतात. पण आजचे मुख्यमंत्री हे खंडणीखोर, चोर, बलात्कारी, अपहरणकर्ते, खुनी लोकांना भेटतात. त्यामुळे फेकूचंद मुख्यमंत्र्यांना त्यांच्या आसपासचे लोक 'जासूस करमचंद' वाटतात. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सभ्य लोकांची भीती वाटते. उद्धव ठाकरे हे जागतिक दर्जाचे छायाचित्रकार आहेत. एकनाथ शिंदे यांना जाऊन विचारा की, तुमचं नाव कशात आहे, तुमच्याकडे कोणता गुण आहे, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला.


निखिल वागळेंवर हल्ला करणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी काय कारवाई केली? राऊतांचा सवाल


पुण्यातील 'निर्भय बनो' या कार्यक्रमावेळी निखिल वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगड आणि विटांचा मारा केला होता. मात्र, याप्रकरणात पुणे पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. पुण्याचे पोलीस आयुक्त गुन्हेगारांची ओळख परेड काढण्याची नौटंकी काढतात. पण निखिल वागळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कारवाई करत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला.


आणखी वाचा


एकनाथ शिंदे सरकारी पैशाने माफियांना पोसतायत, गुंडगिरीला बळ देतायत; राऊतांची घणाघाती टीका