मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चांसदर्भात एक चर्चा समोर आली आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देताना आमच्या माणसांनी त्याग केल्याची आठवण करुन दिल्याची माहिती महायुतीच्या नेत्यानं एबीपी माझाला दिली होती. यासंदर्भात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह यांना महाराष्ट्र कमजोर करायचा होता असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला. भाजप नेत्यांनी बलिदान, त्याग यावर बोलणं हा त्या शब्दांचा अपमान असल्याचं देखील राऊत म्हणाले. 


अमित शाह अन् भाजपला महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता : संजय राऊत


अमित शाह यांनी जागा वाटपाच्या चर्चांमध्ये एकनाथ शिंदेंना भाजपनं मुख्यमंत्रीपद देताना त्याग केल्याची आठवण करुन दिल्याची माहिती समोर आली होती. यावर विचारलं असता संजय राऊत म्हणाले की अमित शाह आणि भाजपनं त्याग केला नाही. अमित शाह यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता. शिवसेना त्यांना तोडायची होती. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करायचा होता, त्यासाठी शिंदे आणि त्यांच्या लोकांचा वापर केला असा आरोप राऊत यांनी केला. 


भाजप नेत्यांना त्याग, बलिदान शब्द शोभत नाहीत 


भाजप नेत्यांना त्याग, बलिदान हे शब्द शोभत नाही. त्या नेत्यांनी बलिदान, त्याग शब्द बोलणं हा त्या शब्दांचा अपमान आहे, अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली. अमित शाह यांना महाराष्ट्र कमजोर करायचा होता, उद्धव ठाकरे,शरद पवारांचा पक्ष त्यांना तोडायचे होते. यासाठी त्यांच्या लोकांना जुळवून घ्यायला सांगितलं होतं, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राची लूट केली त्याला त्याग म्हणतात का असा सवाल राऊत यांनी केला.  बावनकुळेंनी 50 कोटींची जमीन कवडीमोल भावात ओरबडली हा त्याग आहे का? त्याग बलिदान हे शब्द त्यांच्या तोंडी शोभत नाही, असंही राऊत म्हणाले.शिंदे पवार यांचा खेळ भाजप या निवडणुकीत संपवेल.भाजप हा मदारी आहे, ही सगळी माकडं आहेत,या सगळ्या माकडांना आपल्या तालावर नाचवणार आणि सोडून देणार असंही संजय राऊत म्हणाले.  


मविआचं जागा वाटप कसं होणार?


 288 मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरले जातील तेव्हा कोण कुठे, कळेल, आज आणि उद्या बैठका सुरु राहतील. दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट झालेलं असेल.  उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते यांच्याकडून जागा वाटपाचा निर्णय लवकर होण्याची अपेक्षा असल्याचं संजय राऊत म्हणाले.  आज उद्धव ठाकरेंशी चर्चा होईल, शरद पवार यांच्यासोबत चर्चा , काँग्रेस नेते सोबत, लवकरच जागा वाटप जाहीर करु, असंही ते म्हणाले.


संजय राऊत म्हणाले की, आमच्या उमेदवारांना वेळ पुरेसा आहे. आम्हाला पैसे वाटायचे नाहीत, आमचा प्रचार झालेला आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं गद्दारांना धडा शिकवण्याचं ठरलंय, गद्दारांना सरकारमधून घालवायचं ठरलेलं आहे. मविआत किंवा कोणत्याही आघाडी कोणताही पक्ष संपूर्णपणे संतुष्ट नसतो, आघाडी जाहीर होते त्यावेळी समाधान मानायचं असतं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.


सर्वोच्च न्यायालयावर कमालीचा दबाव, इतर गोष्टी असू शकतात, निवडणूक जाहीर होऊन  अपात्रतेचा निर्णय घेणार नसेल तर न्यायालयानं घटनाबाह्य सरकारला समर्थन दिल्याचं दिसतं, संविधानविरोधी सरकार सरन्यायाधीश चालू देतात, आम्हाला तारखांवर तारखा देतात, असं राऊत म्हणाले. 


संजय राऊत लाईव्ह:



इतर बातम्या :


Sanjay Raut : वंदे मातरमला विरोध करणाऱ्याला आमदार केलं, कुठं आहे गब्बर? कुठं आहेत देवेंद्र फडणवीस? संजय राऊतांचा सवाल