Sanjay Raut News : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बेळगाव न्यायालयाने (Belgaon Court) अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर केल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना जिल्हा सत्र न्यायाधीश मुस्तफा हुसेन यांनी जामीन मंजूर केला आहे. ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामाणाचे, शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचण्णवर यांनी संजय राऊत यांच्या वतीने काम पाहिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
बेळगाव लाईव्हच्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत हे उपस्थित राहिले होते. त्याचवेळी निवडणुकांचा काळ होता. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 30 मार्च 2018 रोजी बेळगावात (Belgaon) झालेल्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषण केले होते. संजय राऊत यांनी भाषण करुन दोन भाषिक गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा ठपका ठेवून टिळक वाडी पोलीस स्थानकात संजय राऊत यांच्यासह तिघांवर भादंवि कलम 153 अ आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी जेएमएफसी चौथ्या न्यायालयात दोषारोप पत्र संजय राऊत यांच्यावर दाखल केले होते.
समन्स बजावूनही हजर न राहिल्याने अटकेची कारवाई करण्याचे कोर्टाचे आदेश
यानंतर संजय राऊत यांना तारखेला न्यायालयात हजर राहू शकले नव्हते. हजर राहण्यासाठी त्यांना समन्सही बजावले होते, पण तरीही संजय राऊत सुनावणीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. यानंतर संजय राऊत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. त्यावर आज बेळगाव सत्र न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संजय राऊत मोठा दिलासा मिळाला आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये संजय राऊतांना समन्स
दरम्यान बेळगाव न्यायालयाने नोव्हेंबर 2022 मध्ये संजय राऊत यांना समन्स बजावलं होतं. त्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, "शिवसेना ही सीमाबांधवांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. सीमाबांधवांवर हल्ले झाले किंवा कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तुरुंगात डांबले गेले, तर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असं मी म्हटलं होतं. यामध्ये प्रक्षोभक काय होतं, हे आम्हाला कळत नाही. पण 2018 मध्ये केलेल्या माझ्या भाषणाची दखल घेऊन बेळगाव न्यायालयाने मला 1 डिसेंबरला हजर राहण्यास सांगितलं आहे. मी त्याठिकाणी गेल्यानंतर कोर्टात माझ्यावर तिथल्या संघटनांकडून हल्ला होऊ शकतो. तसेच मला बेळगावमधील तुरुंगात डांबून ठेवले जाऊ शकतं, अशी माहिती मला मिळाली आहे. या सर्व कारस्थानाची माहिती माझ्याकडे आहे. पण मला अटकेची भीती नाही.
हेही वाचा
Sanjay Raut vs Narayan Rane : संजय राऊतांची नारायण राणे यांना मानहानीची नोटीस, काय आहे प्रकरण?