Aurangabad News: औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. गावातील दारू बंदीसाठी महिलांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु असतानाच, तेथून जाणारा भुमरे यांचा ताफा आंदोलन करणाऱ्या महिलांनी अडवला. यावेळी गावात दारू बंदीची मागणी महिलांनी भुमरे यांच्याकडे केली. तर याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन भुमरे यांनी दिल्यानंतर त्यांचा ताफा तेथून पुढे निघाला. 


गंगापूर तालुक्यातील दिवशी पिंपळगाव येथे मोठ्याप्रमाणावर दारू विक्री होत असल्याने गावातील अनेक तरुण दारूच्या आहारी जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आज दिवशी पिंपळगाव फाटा येथे आज रस्ता रोको केला होता. दरम्यान याचवेळी तेथून मंत्री भुमरे यांचा ताफा जात होता. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या महिलांसह गावकऱ्यांनी भुमरे यांचा ताफा अडवला. तसेच गावातील दारू बंद करण्याबाबत त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी भुमरे यांनी देखील कारवाईबाबत आश्वासन दिले. त्यानंतर भुमरे यांचा ताफा पुढे निघाला. 


आमदार प्रशांत बंब यांनी देखील पोलिसांना लिहले होते पत्र 


विशेष म्हणजे याच गावातील दारू बंद करण्याची मागणी करणारे पत्र स्थानिक आमदार प्रशांत बंब यांनी पोलिसांना दिले होते. ज्यात त्यांनी म्हटले होते की, मौजे पिपळगाव येथील रहिवासी सचिन भगवान बावरे, हे इसम गावांमध्ये दहशत निर्माण करून, गावकऱ्यांना वेठीस धरत आहे. सदर इसमावर अनेक गुन्हे दाखल असून, गावात दारू विक्री करतो, तसेच गावातील सार्वजनिक कार्यक्रमाध्ये दारु पिऊन धिंगाणा घालणे, शिव्या देणे, मारहाण करणे इत्यादी अशा अनेक कारणास्तव गावकरी प्रचंड दहशतीखाली आहे. त्यामुळे त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याबाबत गावकऱ्यांनी निवेदन देऊन कळवले आहे. म्हणून सचिन भगवान वावरे नावाच्या व्यक्तीची आपल्या स्तरावरून तात्काळ माहिती घेऊन चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरुन गावांतील नागरीकांना होणारा नाहक त्रास थांबवावा, असे पत्र आमदार बंब यांनी पोलिसांना लिहले होते. 


अखेर महिला रस्त्यावर! 


गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव येथे गावात अवैध दारू विक्री वाढली आहे. त्यामुळे तरुण मुलं आणि महाविद्यालयीन तरुण दारूच्या आहारी जात आहे. त्यात दारू पिऊन आल्यावर घरातील भांडणे देखील वाढली आहे. त्यामुळे गावातील महिलांनी दारू विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर आज गावातील महिलांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान यावेळी महिलांनी प्रशासनाला निवेदन देऊन पुन्हा एकदा गावातील दारू विक्री बंद करण्याची मागणी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aditya Thackeray: आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ; यापुढे अतिरिक्त पोलिस तैनात असणार