Sanjay Raut on Sanjay Shirsat :  दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत केले. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी संजय शिरसाट यांना खोचक टोला लगावला आहे.  


संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. केंद्रीय अर्थसंकल्पावर संजय राऊत म्हणाले की, अनेकांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केले आहे. मध्यमवर्गीयांना खुश करणारे बजेट म्हणतात, पण या मध्यमवर्गीयांनी मोदींना मतदान केले नाही, त्यामुळे त्यांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न आहे. निवडणुका लक्षात घेऊन बजेट सादर केले जाते. बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून तिकडे जास्त निधी, बाकी तामिळनाडू, केरळ वगैरे ठिकाणी काहीही द्यायचे नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 


राऊतांचा संजय शिरसाटांना खोचक टोला


संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, ते अटल बिहारी वाजपेयी आहेत. ते महान माणूस आहेत, त्यामुळे ते करू शकतात, त्यांच्या भावना आहेत त्या भावनांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. तो मोठा माणूस आहे, ते काहीही करू शकतात. ते शरद पवार आणि अजित पवारांना ही एकत्र आणतील. पण चांगली गोष्ट आहे. त्यांचा जो विचार आहे, त्यांची कृतज्ञता आहे, त्याबाबत मी त्यांचा आभारी आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. 


एकनाथ शिंदे अजूनही गुंगीत


एकनाथ शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध राहिलेले नाहीत, असं दावा संजय राऊत यांनी  सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून केला आहे. याबाबत विचारले असता सामनातील रोखठोकमध्ये मी काही विषय मांडलेला आहे. हा विषय तसा सगळ्यांनाच माहीत आहे. महाराष्ट्रातल्या सरकारला बहुमत असले तरी ते एकसंघ नाही. एकमेकांना विरुद्ध कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे संपवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा सरपटणारा प्राणी झाला आहे. एकनाथ शिंदे खाजगीत सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहील, असे मला वचन दिल्यामुळे मी फुटलो. निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्यात आले. काही मंत्रीपदं दिली, काही महत्त्वाची खाते दिली, उपमुख्यमंत्री पद दिले पण एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहिला तर ते अजूनही गुंगीत आहेत. एकनाथ शिंदे अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.   


आणखी वाचा 


Sanjay Shirsat: आता दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आलेय, संजय शिरसाटांचं मोठं विधान; ठाकरे अन् शिंदे गट एकत्र येणार?