नवी दिल्ली : बांगलादेशमधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अटक केली आहे. तसेच बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, त्यांना भयभीत करत राहिले. त्यांचे व्यवसाय आणि संस्थांवर देखील हल्ले झाले. हिंदूंचे खून झाले. हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. इस्कॉनच्या पुजाऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. कोर्टात हिंदूंच्या बाजूने उभे राहिलेल्या वकिलांची देखील हत्या झाली. ही स्थिती स्वतःला हिंदूंचे नेते समजून घेणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवर चर्चा सुरू असेल तर हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भोंदूगिरी करत आहे, ढोंग करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केली.
सीमा सील करून हिंदूंना भारतात येण्यापासून रोखलं जातंय
त्यांना हिंदू फक्त मतांसाठी हवा आहे. हाच विषय जर का पाकिस्तानात घडला असता तर इंडिया गेट समोर उभे राहून पंतप्रधान मोदींनी भाषण केले असते. पाकिस्तान मे घुसकर मारेंगे असे भाषण करून त्यांनी या देशात वातावरण निर्माण केलं असतं. मात्र, आता निवडणुका नाहीत. बांगलादेशमध्ये त्यांना निवडणुका लढाईच्या नाहीत. त्यामुळे हिंदू जगला काय आणि मेला काय? अशी तिकडच्या हिंदूंची अवस्था झाली आहे. भारताच्या सीमा सील करून हिंदूंना आपल्या देशात येण्यापासून रोखले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. तुम्ही हिंदुत्ववादी आहात तर पंतप्रधानांनी स्वतः यात लक्ष घातले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
देशभरात आंदोलनं होताय, भाजप, RSS कुठेही दिसत नाही
पाकिस्तानच्या संदर्भात सचिव पातळीवर का चर्चा झाल्या नाहीत? पाकिस्तानवर का हल्ले केले? कारण काश्मीरमध्ये आपल्या जवानांवर हल्ले करण्यात आले होते. हिंदूंचा जो बांगलादेशमधील प्रश्न आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही हा भारताचा देखील प्रश्न आहे. आपल्या सरकारला वाटत असेल की तो त्यांचा अंतर्गत विषय असेल. पण, हिंदुंवर हल्ला हा आपल्या देशाचा विषय आहे. गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशभरात उग्र आंदोलने सुरू आहेत. त्यात भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस कुठेच नाही. नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाहीत. बांगलादेशच्या हिंदूंवर एक शब्द काढत नाहीत. अमित शाह देखील बोलत नाहीत. विदेश मंत्री बोलत नाहीत. बांगलादेशमध्ये जो हिंदू उरलाय त्याला बंगालची फाळणी झाल्यामुळे तिथे राहावे लागत आहे. त्यांच्या बाजूने कोण उभे राहणार? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
आणखी वाचा