Solapur: राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून सोलापूरच्या माळशिरज मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव चर्चेचा विषय ठरलं आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केलेल्या मारकडवाडी गावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावे यासाठी 29 नोव्हेंबरपासून आंदोलनाला सुरुवात केली होती. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मरकडवाडी येथे हजेरी लावल्यानंतर आता मरकडवाडीत आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी भिडणार आहेत. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपकडून आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे पवारांच्या सभेला उत्तर देणार आहेत . तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही गावात येणार आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे नेते येणार असल्याने दोन्ही गटाची लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत.
मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या एका गटाने ईव्हीएम मशीन वर शंका घेत बॅलेट वरील मतदानासाठी सुरू केलेले आंदोलन आता चांगलाच जोर धरू लागले आहे . या गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांना मानणाऱ्या गटाने ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाल्याचा आरोप करीत बॅलेट वर मतदान घेण्याची मागणी केली होती . 3 डिसेंबर रोजी ग्रामस्थांनी स्वखर्चाने बॅलेट वर मतदानाची तयारी केली असताना प्रशासनाने जमावबंदीचा आदेश लागू केल्याने ही मतदान प्रक्रिया मागे घ्यावी लागली होती. यानंतर शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी या गावात भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सूचित केले होते.
जाहीर सभांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता
आता आज भाजपकडून पराभूत आमदार राम सातपुते यांच्या गटाच्या ग्रामस्थांनी त्याच ठिकाणी सभेचे आयोजन केले असून या सभेतून ईव्हीएम मशीनवरील फेक नरेटीवला उत्तर दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शरद पवार यांच्या दौऱ्याच्या वेळेला गावात लागलेले मुख्यमंत्री व राम सातपुते यांचा फलक झाकण्याचा प्रयत्न शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केल्यावर जोरदार बाचाबाची झाली होती. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा प्रकार मिटवला होता. मात्र आज आता गावातील त्या चौकात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सभेचे आयोजन केल्याने पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
नाना पटोले, उत्तम जानकरांसह पोचणार मारकडवाडीत
एका बाजूला राहुल गांधी या गावातून ईव्हीएम च्या विरोधात लॉन्ग मार्च काढणार अशा पद्धतीची तयारी सुरू असताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही मारकडवाडी येथे येणार आहेत. त्यांचाही दौरा पडळकर यांच्या दौऱ्याच्या वेळीच होता मात्र प्रशासनाने त्यांना या वेळेला येण्यास परवानगी न दिल्याने ते आता दुपारी तीन वाजता गावात पोहोचणार आहेत . गोपीचंद पडळकर हे सकाळी साडेदहा वाजता पुणे येथून हेलिकॉप्टरने गावात पोहोचतील तर नाना पटोले हे देखील आमदार उत्तम जानकर यांना घेऊन हेलिकॉप्टरनेच गावात पोहोचणार आहेत. मार्कड वाडी सारख्या छोट्याशा गावात आज दोन हेलिकॉप्टर येणार असून भाजप आणि महाविकास आघाडी नेत्यांच्या दौऱ्यामुळे गावातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे.
यापूर्वी बॅलेट वर मतदान करण्याचा प्रयत्न केलेल्या गावातील जानकर गटात कडील जवळपास 100 ग्रामस्थांवर गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या आमदार उत्तम जानकर हे माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावातून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे यासाठी ठराव करून घेत असून यावरून ते निवडणूक आयोग आणि न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. अशा वेळेला आता भाजपही रिंगणात उतरले असून आज पडळकर खोत आणि सातपुते यांच्या सभेतून ईव्हीएम च्या विरोधात पसरविला जात असलेला फेक नरेश याला उत्तर दिले जाणार आहे
पोलिसांचा बंदोबस्त
आज आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह राम सातपुते यांची ही जाहीर सभा थोड्या वेळात होत असून गावातील तणावाची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आलेले आहे . या छोट्याशा गावात सध्या शरद पवार गट आणि भाजपची मोठी बॅनरबाजी करण्यात आली असून आज भाजपच्या सभेनंतर दुपारी तीन वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही गावात पोहोचणार आहेत. त्यामुळे आज महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीचे नेते येणार असल्याने दोन्ही गटाची लोक आपले शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत