Sanjay Raut on Eknath Shinde: आगामी काळात एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या लोकांवर तपास यंत्रणांकडून मोठी कारवाई होऊ शकते, असे भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. एकनाथ शिंदे हे नुकतेच दिल्लीत जाऊन आले. यावेळी त्यांनी अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या काही लोकांवर भविष्यामध्ये नक्कीच कारवाया होणार आहेत. त्याप्रकारचे पुरावे केंद्रीय तपासयंत्रणांच्या हाती लागले आहेत. शिंदेंना वाचवणाऱ्या शक्ती दिल्लीत कमजोर होताना मला दिसत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यापेक्षा दिल्ली जास्त मला माहिती आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामाची पद्धत मला माहिती नाही. इन्कम टॅक्सची (Income Tax) नोटीस मी गांभीर्याने घेत नाही. हा एक इशारा आहे. याच्यापेक्षा वेगळ्या घडामोडी ऑगस्टच्या अंतापर्यंत घडतील, असे मला संकेत आहेत. त्यामुळे या राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Sanjay Raut: सगळे पुरावे गोळा होत असतात, योग्यवेळी कारवाई होते: संजय राऊत
ज्यांना आता इन्कम टॅक्सची नोटीस आलेय, तो संबंधित मंत्री आहे, त्यांचा एक व्हिडीओ मला कोणीतरी पाठवला. त्यामध्ये हे मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. हे पुरावे सर्वत्र जात असतात. सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणीही हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो. हा भ्रम काही काळ टिकतो. हे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात. योग्य वेळ येताच त्याच्यावर कारवाई होते, ती सगळ्यांवर होते. त्यापासून कोणीही वाचत नाही. सत्तेचं संरक्षण तात्पुरते असते. भविष्यात शिंदे गटाला या कारवाईला तोंड द्यावे लागेल. दिल्लीतील तुमचे संरक्षक जसजसे कमजोर होतात, अशावेळी तपासयंत्रणा त्यांच्याकडील सगळ्या फाईल्स उघडतात. ते आता हळूहळू सुरु झाले आहे. एकतर तुम्हाला पूर्णपणे शरणागत होऊन सरपटणाऱ्या प्राण्यासारखं सत्तेत राहावं लागेल. नाहीतर बऱ्याच तडजोडी कराव्या लागतील. मला वाटत नाही, एखाद-दुसरा नेता वगळता एकनाथ शिंदेंना कोणी संरक्षण देत असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
मराठी एकजूट महाराष्ट्रात होत आहे. विधानसभा आणि लोकसभेला आपण घोटाळे करुन निवडणुका जिंकलो. पण हा फोर्स असाच राहिला तर अनेक अडचणी निर्माण होतील. त्याचा फटका आपल्या सरकारला बसेल आगामी निवडणुकीत. त्यामुळे मला मुख्यमंत्री करा, मी हे सगळं मॅनेज करु शकतो. वाटल्यास मी तुमच्या पक्षात येतो, असा प्रस्ताव एकनाथ शिंदेंनी पुन्हा अमित शाह यांच्यासमोर ठेवल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.
आणखी वाचा