मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा मोठा चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदेंनी मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुपचूप दिल्ली दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या असल्याची माहिती आणि फोटो समोर आले आहेत. शिंदेंच्या दौऱ्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवरती बोचरी टीका केली आहे. राऊत यांनी आपल्या सोशल मिडीयावरती शिंदेंच्या दौऱ्याबाबत टीका करणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबर त्यांनी माध्यमांशी बोलताना शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
त्यांचे आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावे लागतात
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, दिल्ली दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांचे गुरु अमित शाहांचे चरण धुवून आशीर्वाद घेतले. हे काही मी चेष्टेने किंवा दुसऱ्या कोणत्या अर्थाने बोलत नाही. मी सध्या बोलत आहे ते शंभर टक्के खरं आहे. एकनाथ शिंदे यांचे गुरु दिल्लीत आहेत. ते अमित शहा, नरेंद्र मोदी आहेत. शिंदे हे जे पात्र आहे, जो गट आहे तो यांनी निर्माण केला आहे. त्यांचे आदेश एकनाथ शिंदे यांना पाळावे लागतात. ते काही शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळी जाऊन कौल लावत नाहीत. त्यामुळे ते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शंभर टक्के दिल्लीला जाणारच होते, त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
पायावर चाफ्याची फुले वाहिली, दोन्ही पायांना चंदन लावलं
मी जेव्हा तुम्हाला माहिती देतोय, तेव्हा ती अधिकृत माहिती असते. यापूर्वी सुद्धा मी त्यांच्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्यासोबत नेलं होतं. पाय धुण्याचं सामान, फुल, पूजाअर्चा आणि त्यानुसार ते गेले. त्यांनी दिल्लीत त्यांची पूजा चर्चा केली. गुरु म्हणून अमित शहा यांची त्यांनी पूजा केली. गुरु म्हणून त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं. त्यांच्या पायावर चाफ्याची फुले वाहिली. त्यांच्या दोन्ही पायांना चंदन लावलं. त्याचे फोटो जरी काढता आले नसले तरी त्याची माझ्याकडे पक्की माहिती आहे. त्यानंतर ते इतर नेत्यांना भेटले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची नेहमीप्रमाणे तक्रार केली, ते आमची कोंडी करत आहेत. ते आम्हाला काम करू देत नाहीत. ते आम्हाला अडचणीत आणत आहेत. आमच्या आमदारांच्या चौकशी लावल्या आहेत असा एकनाथ शिंदे यांचा तक्रारीचा सूर होता, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आहे.
शिंदे म्हणाले मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय
त्यानंतर एकनाथ शिंदेंनी स्वतःच शाहांना ऑफर दिली की, आता महाराष्ट्रात परत जी मराठी माणसांची एकजूट झाली आहे. ती अधिकाधिक भक्कम होईल, त्याचा त्रास आम्हाला होईल. काहीही करून ही जी एकजूट होत आहे त्यात आपल्याला लक्ष घालावे लागेल. ही मराठी माणसांची एकजूट कशी तोडता येईल हे पहावं लागेल नाहीतर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठे नुकसान होईल. याबाबत दोघांनी चर्चा केली. यावरती अमित शहा यांनी विचारलं, 'शिंदेजी आपके मन मे क्या हैं? तेव्हा शिंदे म्हणाले मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. मी जर मुख्यमंत्री झालो तर मी या सर्व गोष्टी थांबवेन आणि ती थांबवल्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाला स्थैर्य लाभेल. हे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितलं. त्यानंतर परत अमित शहा म्हणाले, आता मुख्यमंत्री तर भाजपाचाच होईल, त्याच्यावर शिंदे म्हणाले की मी माझ्या गटासह भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे. मी भाजपात विलीन व्हायला तयार आहे. पण मला मुख्यमंत्री करा. त्यांची भूमिका आहे ही त्यांनी वारंवार आधीही सांगितलेली आहे आणि काल देखील त्यांनी पुन्हा एकदा ही सांगितली. त्यांनी काल देखील मी माझ्या पूर्ण गटासह तुमच्यात विलीन होतो पण मला मुख्यमंत्री करा असं म्हटलं असल्याचं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य
वारंवार दिल्लीत जाणं दिल्लीपुढे नाक घासणे, हे प्रकार आधी झालेले आहेत. काँग्रेसच्या राजवटीत दिल्लीतून सर्व हालचाली होत होत्या. पण स्वतःला शिवसेना म्हणून घेण्यात, स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल वारसदार म्हणून घेणाऱ्यांनी अशा प्रकारचे विधान करणे, खाजगीत असतील किंवा बाहेर असतील त्या दिल्लीतील राजकर्त्यांसमोर झुकणं हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. मी जे बोलतोय ते शंभर टक्के सत्य आहे. जर हे खरं नसेल तर त्यांनी माझ्याशी युक्तिवाद करावा, हे असंच घडलं आहे, असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे