Sanjay Raut Brother Sandip Raut Post मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भावाने केलेल्या पोस्टमुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. संजय राऊत यांचे सख्खे भाऊ संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट केली. यानंतर काही वेळातच ती डिलीट केल्याचं दिसून आले. मात्र संदीप राऊत यांनी केलेल्या पोस्टचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारीही आहेत.
संदीप राऊत यांनी फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं?
संदीप उर्फ अप्पा राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट करत शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्ती केली. नेत्यांपुढे पुढं-पुढं करणाऱ्यांनाच पक्षात पद मिळत असल्याचा केला आरोप संदीप राऊत यांनी आपल्या पोस्टद्वारे केला आहे. ही पोस्ट संदीप राऊत यांनी थोड्यावेळेनंतर डिलीट केली होती. त्यामुळे राऊतांच्या घरात नेमकं चाललंय काय?, असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.
संदीप राऊतांचा खुलासा-
माझे फेसबुक अकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे ही पोस्ट माझ्या अकाउंटवर दिसली. आता मी रिकव्हर केले असून त्या पोस्टचा माझा काही संबंध नसून मी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एकनिष्ठ शिवसैनिक असून कोणीही त्याचा विपर्यास करू नये...असं संदीप राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा-
सत्ताधारी सभागृह चालू देत नाहीत. हे फार आश्चर्यकारक आहे. सभागृह चालू देण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची असते. गौतम अदाणी विषय हा कोणाचं व्यक्तिगत विषय नाही. अमेरिकेच्या न्यायालयाच्यानुसार आम्ही अडाणी मुद्यावर बोलायला उभे राहिलो तर आम्हाला बोलू देत नाहीत. आता जॉर्ज सोरेस वर सभागृह चालू देत नाहीत. भारताच्या इतिहासात अशा घटना कधी घडल्या नाहीत. विरोधी पक्षाची अवहेलना करायची ही कुठली लोकशाही आहे? राज्यसभा सभापती पक्षपातीपणा करत आहेत. आमच्याकडे अविश्वास ठराव मांडण्याशिवाय पर्याय नव्हता, असंही अविश्वास ठरवाबाबत संजय राऊत म्हणालेत.