मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या शपथविधीनंतर आत सगळ्यांच्या नजरा मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये काही मंत्रि‍पदांच्या तिढ्यामुळे विस्तार रखडला होता. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीअंती शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणामुळे त्यांना या बैठकीला जात आले नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून त्यांचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी बोलणे करुन दिले. यावेळी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाल्याचे समजते. 


ठाण्यातील या बैठकीनंतर शिवसेनेला 12 मंत्रीपदं आणि उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रि‍पदांसाठी बरेच दिवस प्रेशर गेम खेळला. याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसत आहे. कारण शिंदे गटाच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे. जास्त मंत्रीपदं घेऊन एकनाथ शिंदे यांनी योग्य तो मेसेज दिल्याचेही सांगितले जात आहे. आता शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चेला बसतील. भाजप-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चेची एक फेरी दिल्लीत पार पडण्याचीही शक्यता आहे. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांत खातेवाटपही निश्चित होईल, असे सांगितले जात आहे. 


अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजपसह शिवसेनेचा विरोध


विधानसभेचे  तीन दिवसीय अधिवेशन संपल्यावर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली आहे. महायुतीतील आमदारांच्या मनात मंत्रिपदावरुन धाकधूक वाढली आहे. मंत्रिपदांबाबत गुप्तता पाळली जात असल्याने आमदारांचं टेन्शन वाढले आहे. अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजप आमदारांसह शिवसेना आमदारांचाही विरोध असल्याचे सांगितले जात आहे. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तारासाठी शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. 


भाजपचे आमदारही संभ्रमात


एकीकडे शिवसेनेचे मंत्री टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे भाजपच्या आमदारांची अवस्थाही वेगळी नाही. दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्याने भाजपचीही यादी लटकल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना  विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती. पुढच्या 48 तासात तरी दिल्लीत काही हालचाली घडणार की, आणखी वेळ लागणार याकडे संभाव्य मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचेही टेन्शन वाढले आहे.



आणखी वाचा


महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट, एकनाथ शिंदे वेगळाच पॅटर्न वापरणार?