Pravin Gaikwad: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काल (13 जुलै) अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शाईफेक करण्यात आली.
सदर प्रकरणी भाजप कार्यकर्ता दीपक काटेसह सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनीही प्रवीण गायकवाड यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या राड्यानंतर प्रवीण गायकवाडांचा आयोजीत सत्कार सोहळा पार पडलाय. तर या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करत पंढरपुरात संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी संघटनांनी प्रवीण गायकवाडांवर दुग्धाभिषेक केला. दरम्यान, या घटनेनंतर आज प्रवीण गायकवाड यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना काही धक्कादायक दावे केले आहेत.
प्रवीण गायकवाडांचा आरएसएसवर धक्कादायक आरोप-
माझ्यावर हल्ला केलेला दीपक काटे हा भाजप युवा मोर्चाचा सरचिटणीस असल्याची माहिती असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत . त्यालाच या हल्ल्यासाठी निवडले होते. हा पूर्व नियोजित हल्ला होता आणि आम्ही बेसावध होतो हे खरंय, असं प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. तसेच काही दिवसापूर्वी बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडला संपवण्याचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत ठरला होता. पुरोगामी विचारांच्या नेत्यांना संपवायचे काम 2014 पासून सुरू झाले आहे. यासाठीच दीपक काटे सारख्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला निवडले, असा दावाही प्रवीण गायकवडांनी यावेळी केला.
आरोपीला वाचवण्यासाठी मंत्रालयातून फोन-
आरोपी दीपक काटे याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले असून याच्यासाठी मंत्रालयातून फोन येत आहेत. खरंतर इतके गंभीर गुन्हे असलेल्या काठीने ज्या पद्धतीने मला जिवंत मारण्याचा कट रचला होता त्यानंतरही त्याला किरकोळ कलमे लावून सोडायचा प्रयत्न सुरू आहे. या ठिकाणी अनेक सहकाऱ्यांचे सोन्याच्या चैन वैगरे चोरीला गेल्या आहेत, अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. आता याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. तेच राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असून पुरोगामी चळवळीवर होत असलेले हल्ले याबाबत त्यांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे, असं प्रवीण गायकवाड म्हणाले.
प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे काय म्हणाला?
हल्ल्याच्या घटनेनंतर दीपक काटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असे नाव लावण्यात यावे कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय. छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते, त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही मागील दीड ते 2 वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करतोय. संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर बेताल वक्तव्य केले होते आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात, त्यामुळे हा निषेध आम्ही व्यक्त केला, असे दीपक काटे यांनी सांगितले.