Pravin Gaikwad attack in Akkalkot: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर रविवारी दुपारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला. ते काल अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमाला जन्मेजयराजे भोसले हेही उपस्थित होते. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) आपल्या गाडीतून कमलाराजे चौकाच्या परिसरात उतरले. त्यावेळी शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासले. या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांना आक्रमकपणे गाडीतून खेचून बाहेर काढले आणि त्यांच्या चेहऱ्यावर वंगणाचे काळे तेल ओतले. त्यामुळे गायकवाडांचा संपूर्ण चेहरा काळ्या रंगाने माखला होता. यानंतरही शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाडांना पकडून ठेवले होते. अखेर काहीवेळाने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांना तेथून बाहेर काढले. या हल्ल्यानंतर प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) हे सोलापूरमध्ये आले. सोलापुरात डॉ. शिवरत्न शेटे यांच्या शिवसह्याद्री आरोग्य धाम या क्लिनीकमध्ये प्रविण गायकवाड यांची तपासणी करण्यात आली.
या हल्ल्यानंतर शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेने आपल्या कृतीमागील कारण स्पष्ट केले. संभाजी ब्रिगेडच्या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. तो काढून टाकावा, अशी मागणी आम्ही केली होती. तसेच संभाजी ब्रिगेडकडून स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करुन त्यांचा अवमान करण्यात आला होता. या रागातून शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला.
पोलिसांनी याप्रकरणी एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली असून उर्वरित दोघे फरार आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे (रा. इंदापूर, जि. पुणे), किरण साळुंखे (रा. भवानी नगर, इंदापूर, जि. पुणे), भैय्या ढाणे (रा. भवानी नगर, इंदापूर, जि. पुणे), कृष्णा क्षीरसागर (रा. कसबा, बारामती शहर, जि.पुणे), अक्षय चव्हाण (रा. तांदूळवाडी, बारामती, जि. पुणे), बाबू बिहारी (रा. तांदूळवाडी, ता. बारामती, जि. पुणे), भवानेश्वर बबन शिरगिरे (रा. इंदापूर, जि. पुणे) यांचा समावेश आहे. शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे हे भाजपशी संबंधित असल्याचाही आरोप केला जात आहे. या सगळ्यांवर बीएनएस कलम 115, 189, 191, 190 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pravin Gaikwad: माझ्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत; प्रविण गायकवाडांचा आरोप
माझ्यावरील हल्ला हा सरकार पुरस्कृत होता, असा आरोप प्रविण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर केला. संभाजी ब्रिगेडचे नाव बदलण्यासंदर्भात आमची बोलणी सुरु होती. मात्र, ते नाव दुसऱ्या एका संस्थेने रजिस्टर करुन ठेवले होते. याआधीच 'छत्रपती संभाजी ब्रिगेड' यांचे नाव देण्यात यावे यासाठी धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचण असल्याने हे नाव बदलता आले नाही, असे प्रविण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
केवळ छत्रपती संभाजी महाराजांचे नाव संस्थेला द्यावे, यापुरताच हा हल्ला मर्यादित नव्हता. तुम्हाला हे माहितीये की हे सरकार कुणाचे आहे. हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे. पण विचार कधी संपत नसतात. ज्या लोकांनी माझ्यावर हल्ला केला त्यांच्याविषयी मला मनात काही राग नाही. त्यांना या गोष्टीचा कधी ना कधी पश्चाताप होईल. शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काळं वंगण तेल टाकलं, माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जी विचारधारा आहे, डॉ. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर यांचा खून झाला. गौरी लंकेश यांचाही खून झाला, सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. कधी पक्ष फोडले जातात, पक्षानंतर कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. आमचा विचार हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला विचार आहे. संभाजी ब्रिगेडचा काम चालूच राहणार आहे, पण हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी याचा निषेध करणार नाही. मात्र, ज्यांनी हे घडवून आणलंय ही शेवटाची सुरुवात आहे एवढच सांगतो, अशी प्रतिक्रिया प्रविण गायकवाड यांनी हल्ल्यानंतर दिली होती.
Sambhaji Brigade News: प्रविण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर तीव्र राजकीय पडसाद
प्रविण गायकवाड यांच्या तोंडाला काळे फासण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या हल्ल्यासाठी भाजपला जबाबदार धरत जोरदार टीका केली. 'संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आहे. अशा रितीने जाणीवपूर्वक समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रकार केला जातोय. यामागे कोणती डोकी आहेत? हे आपल्याला माहिती आहे. या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध', असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
तर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करते. याच प्रवीण दादांनी फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. हल्लेखोर सुद्धा बहुजन वर्गाचे आणि ज्यांच्यावर हल्ला झाला तेही बहुजन वर्गाचे. त्रयस्थ यात मजा घेत आहेत. भावांनो! मला फक्त एक प्रश्न आहे, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी जिजाऊ माँसाहेबांबद्दल बोलले होते, तो प्रशांत कोरटकर शिवयारांबद्दल बोलला होता तेव्हा हे हल्लेखोर कोणत्या बिळात लपले होते?, असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला.
BJP Deepak Kate: प्रविण गायकवाडांवर हल्ला करणारा दीपक काटे काय म्हणाला?
हल्ल्याच्या घटनेनंतर दीपक काटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावापुढे छत्रपती किंवा धर्मवीर असे नाव लावण्यात यावे कारण संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्याने त्यांचा अवमान होतोय. छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी राजे होते, त्यांच्या नावाचा वारंवार अपमान होत असल्याने आम्ही मागील दीड ते 2 वर्षांपासून हे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी करतोय. संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव यांनी स्वामी समर्थ महाराजांवर बेताल वक्तव्य केले होते आणि त्यांचेच प्रदेशाध्यक्ष स्वामींच्या भूमीत येऊन सत्कार स्वीकारतात, त्यामुळे हा निषेध आम्ही व्यक्त केला, असे दीपक काटे यांनी सांगितले.
आणखी वाचा
प्रविण गायकवाडांवर हल्ला, भाजपचं थेट कनेक्शन; चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...