Sambhaji Brigade Pravin Gaikwad attack in Solapur: राज्यातील ग्रामीण भागात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची वात तेवत ठेवणारे  संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांना रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांच्या चेहऱ्यावर वंगणाचे तेल ओतून त्यांचा चेहरा काळा केला. हल्लेखोरांमधील दीपक काटे हा भाजपचा (BJP) पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. प्रविण  गायकवाड यांच्यावरील हल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटले. या प्रकारानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रविण गायकवाड यांची फोनवरुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांनी प्रविण गायकवाड यांच्याकडून हल्ल्याबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली. हल्ला करणारे कार्यकर्ते कोण होते, कुठून आले होते, तुम्हाला मारहाण झाली का, घटनास्थळी पोलीस होते का? असे प्रश्न शरद पवार यांनी गायकवाडांना विचारले. गायकवाड यांनी ही सगळी माहिती शरद पवारांना सांगितली.मी सत्काराच्या कार्यक्रमाला अक्कलकोटमध्ये गेलो होतो. कमलाराजे चौकात गाडीतून खाली उतरल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. अतिशय आक्रमक पद्धतीने कार्यकर्ते माझ्या अंगावर चालून आले. त्यांनी माझ्या अंगावर वंगण ओतले. कपडे फाडण्याचा प्रयत्न केला, असे प्रविण गायकवाड यांनी शरद पवार यांना सांगितले. त्यामुळे आता या सगळ्यावर शरद पवार काय भाष्य करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर बबन शिरगिरे राहणार इंदापूर आणि कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबु बिहारी (रा. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यापैकी दोन जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपी फरार आहेत. दरम्यान, दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. दीपक काटे हा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केला.

आणखी वाचा

Video: संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं, डोक्यावर ओतली शाई; अक्कलकोटमध्ये गोंधळ

हल्लेखोर आणि ज्यांच्यावर हल्ला झाला दोघेही बहुजन वर्गाचे, त्रयस्थ मजा घेत आहेत; प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर रोहिणी खडसेंचा भाजपवर वार