भिवंडी : समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party)भिवंडी पूर्व विधानसभा (Bhiwandi East Assembly)  आमदार रईस शेख (MLA Rais Shaikh) यांनी आमजारकीचा राजीनामा मागे घेतला आहे. भिवंडी शहरात समाजवादी पक्षामध्ये दलालांचे राज्य प्रस्थापित झाले असल्याचं सांगत त्या विरोधात बंड पुकारत भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला होता. शुक्रवारी रात्री उशिरा आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. या राजीनामा नाट्यानंतर त्याचे तीव्र पडसाद भिवंडी शहरातील आमदार रईस शेख यांच्या समर्थकांकडून उमटायला सुरुवात झाली होती. 


समाजवादी पक्षांमध्ये दलालांचा शिरकाव, रईस शेख यांचा आरोप


रईस शेख यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या कार्यालयाबाहेर समर्थक जमले होते. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा भिवंडीत रईस शेख दाखल झाले. त्यांनी शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत आपण राजीनामा मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करीत असताना भिवंडी शहरात समाजवादी पक्षांमध्ये दलालांचा शिरकाव झाला असून या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सौदेबाजी सुरू केली आहे, असा आरोप रईस शेख यांनी केला असून पक्षाच्या भल्यासाठी भिवंडी शहरातील अशा दलाल प्रवृत्तीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षातून हाकलून द्यावे अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.


रईस शेख यांचं राजीनामा नाट्य थंडावलं


समाजवादी पार्टीचे भिवंडी पूर्व विधानसभा आमदार रईस शेख यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता. समाजवादी पक्षात अंतर्गत कुरघोडी सुरु असून याच राजकारणातून सपाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला होता. यानंतर शेकडो महिला कार्यकर्त्या रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर समर्थनार्थ एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं. रईस शेख समर्थकांनी सोशल मीडियावरही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.


रईस शेख यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा मागे


सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलेलं असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आमदारकीचा राजीनामा दिला होता. सपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला होता. मात्र ही बातमी सोशल मीडियावरून भिवंडी शहरात आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरल्यानंतर त्यांच्या कार्यालयाबाहेर शेकडो महिला एकत्रित झाल्या होत्या. पण, रईस शेख यांचं कार्यालय बंद करण्यात आलं होतं. या राजीनामा नाट्यानंतर रईस शेख यांनी शनिवारी राजीनामा घेतला आहे.


विद्यमान आमदाराच्या राजीनाम्याने खळबळ


भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या तीव्र भावना पाहायला मिळाल्या होत्या. या महिलांनी कार्यालयाबाहेर एकत्रित होऊन जोरदार घोषणाबाजी केली. रईस शेख यांच्या समर्थनार्थ त्यांच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊ देणार नाहीत आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर, आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला होता.