Bharat Gogawale on Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर डिलाईल रोडच्या पुलाच्या दुसऱ्या लेनचं उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, यावरून ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आमने सामने आले असून, आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंकडून (Bharat Gogawale) देखील आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 'राज्यात कायद्याचे राज्य आहे. भावनेच्या आहारी उद्या कोणी उठेल आणि काहीही करेल. त्याला ब्रेक लागला पाहिजे, असे म्हणत गोगावले यांनी आदित्य यांच्यावर टीका केली आहे. 


दरम्यान यावेळी बोलतांना गोगावले म्हणाले की, "राज्यात कायद्याचे राज्य आहे. त्यांनी काहीही चुका करायच्या आणि सरकारने गप्प बसायचे असे कधी होत नाही. भावनेच्या आहारी उद्या कोणी उठेल आणि काहीही करेल. त्यामुळे याला आता ब्रेक दिला तर उद्या दुसरा कोणी हिम्मत करणार नाही,” असे गोगावले म्हणाले. तर, भरत गोगावले हे सोलापूरच्या पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले असतांना, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.  


भुजबळांवर निशाणा...


मराठा आणि आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर देखील गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "भुजबळ हे मंत्री असल्याने त्यांनी असे बोलू नयेत, याबाबत सगळ्यांनी त्यांना सांगितले आहे. पण, भावनेच्या आहारी जाऊन काही मंडळी लोकांना बघून असे वक्तव्य करतात, असा टोला गोगावले यांनी भुजबळांना लगावला. तसेच, जर तुमचं आरक्षण काढून दुसऱ्याला दिले तर तुम्ही बोलले पाहिजे. पण, आम्ही तुमचे आरक्षण काढतच नाही, मग तुमचा बोलण्याचा काय संबध येत आहे. तसेच, कोणावर अन्याय होणार नाही असे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केल्यावर पुन्हा असे बोलणे योग्य नसल्याचे, गोगावले म्हणाले. 


मनोज जरांगे यांनी याचाही विचार करावा...


सरसकट मराठ्यांना आरक्षण कशाप्रकारे देता येईल, याचा शोध सुरु आहे. मात्र, हे आरक्षण न्यायालयात टिकणारे हवे असल्याने याचाही विचार मनोज जरांगे यांनी करायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना न्यायालयात कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. काहीतरी दिले आणि गेल्यावेळी प्रमाणे न्यायालयात रद्द झाल्यास काय?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. सोबतच, एकाला आरक्षण देतांना दुसऱ्यावर अन्याय करून ते आरक्षण देण्याची भूमिका सरकारची नाही, असेही गोगावले म्हणाले. 


मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया...


मंत्रिमंडळ विस्तारावर देखील गोगावले यांनी मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली आहे. “पांडुरंगाच्या दारात तर आलोय, आता पांडुरंगाला आमची कणव असेल तर तो करेल. रुक्मिणी मातेलाही साकडे घालणार आहे की, पांडुरंगाला काय कोडे पडले आहे ते सोडवं. आमच्या हातात तर काही नाही, पण जर त्या दोघांनी काही चमत्कार केला तर काहीतरी होईल असेही, गोगावले म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aaditya Thackeray : विरोधकांची बोलती होणार बंद? आदित्य ठाकरेंवर पहिलाच गुन्हा दाखल!