मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर अनेकदा टीका होताना आपण पाहिली आहे. कार्यकर्त्यांना रस्त्यावर न उतरवता स्वतः गुन्हा घ्यायला शिका अशी विरोधक त्यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. मात्र अखेर आदित्य ठाकरे यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे विरोधकांची आता बोलती बंद होणार का? आदित्य ठाकरे आक्रमक होणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. 


लोअर परळ पुलावरील काम अंतिम टप्प्यात आलेले असताना दक्षिण वाहिनी बेकायदेशीररित्या वाहतुकीसाठी खुली केल्याप्रकरणी वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल झाला. पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार ना. म. जोशी. पोलीस ठाण्याने शनिवारी पहाटे याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह सचिन अहिर, सुनील शिंदे व इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे लोअर परळ आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला होता. या पुलावरील दक्षिण वाहिनीचे काम पूर्ण होत आले असून पथदिवे, मार्गिका आखणी, रंगकाम आदी कामेही लवकरच पूर्ण करून हा पूल तीन-चार दिवसांत वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस होता. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, 16 नोव्हेंबर रोजी पुलावरील दक्षिण वाहिनीवरील रस्ता रोधक हटवून, नारळ फोडून तो वाहतुकीसाठी खुला झाल्याचे जाहीर केले. मात्र यावर विरोधक टीका करत आहेत.


लोअर परल उड्डाणपुलावरून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या पुलाची स्थिरता चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या वाहिनीवरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने मुंबई महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता पुरूषोत्तम इंगळे यांनी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार देताना म्हटलं आहे. मात्र अशा प्रकारे लोकांच्या हितासाठी माझ्यावर गुन्हे दाखल होत असतील तर मी मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहे असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिले. 


अनेक ठिकाणचे आंदोलन आणि मोर्चांमुळे विरोधक आदित्य ठाकरे आणि ठाकरे घराण्यावर तुमच्यासाठी कार्यकर्ते गुन्हे दाखल करून घेतात, तुम्ही रस्त्यावर उतरा आणि गुन्हे अंगावर घ्या अशी टीका करताना पाहायला मिळतात. त्यात आता आदित्य ठाकरे यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे आदित्य ठाकरे आगामी काळात आक्रमक होतात का आणि बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे लोकांसाठी काम करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


ही बातमी वाचा :