मुंबई : पुणे हायप्रोफाईल पोर्शे कार अपघात (Pune Accident) प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच विनापरवानगी पोर्शे वाहन वितरीत करण्याऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danway) यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने 19 मे रोजी पहाटे उशिरापर्यंत पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अनिस अवधिया व अश्विनी कोस्ता या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे, हि बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. तसेच, यामध्ये अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाहन परवाना नसतानाही वाहन चालविण्यास दिल्याने दोन निरापराध व्यक्तींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या अग्रवाल यांचेवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.


सदरचे पोर्शे वाहन हे परराज्यातून आणले असून त्याची नोंदणी झालेली नाही. तसेच वाहन क्रमांक देखील देण्यात आलेला नाही. वाहनाचा वाहनकर सुद्धा भरण्यात आलेले नाही. तरी देखील 2-3 महिन्यांपासून सदरचे वाहन वापरात होते. या वाहनावर संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती. त्यामुळे, यासाठी जबाबदार असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यावरही नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी.


पबचे परवाने रद्द करावेत


अल्पवयीन मुलांना मद्यपान पुरविणाऱ्या पबवर कडक कारवाई करून परवाने रद्द करावे, ज्या पबमध्ये अल्पवयीन मुलाने पार्टी करून मद्यपान केले अशा कोझी पबमध्ये व ब्लॅक पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून अल्पवयीन मुलांना मद्य दिले जाते. त्यामुळे या पबवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवेंनी पत्राद्वारे केली आहे. तसेच, पुणे शहरात मोठया प्रमाणात महाविद्यालयीन मुले पबमध्ये जात असून ते अल्पवयीन आहेत की नाही याची तपासणी केली जात नाही. त्यामुळे अशा सर्व पबची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या पुणे शहरातील सर्व पब व बारवर कारवाई करुन पबचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे. 


पीडित कुटुंबीयांस आर्थिक मदत करा


पोर्शे कंपनीच्या वितरकाने विना नोंदणी व विना क्रमांक वाहन ग्राहकाला वापरण्यात दिले आहे. सदरची बाब गंभीर असून याची चौकशीही करण्यात यावी. अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिस ठाण्यात व्ही.आय.पी.वागणूक देवून घाईघाईने त्याला जामीन मिळण्यास मदत केल्याची चर्चा आहे. त्यामुळे यासंबंधी दोषी अधिकाऱ्यांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देखील कारवाई तातडीने करण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. तसेच यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देण्याबाबत शासनाने पावले उचलावीत, अशी सूचना दानवे यांनी उपरोक्त पत्रात केली आहे.