मुंबई: अमोलला बोट धरून मी शिवसेनेत आणलं, पण पक्षामध्ये, राजकारणामध्ये त्याला जी संधी मिळायला हवी होती ती त्याला मिळाली नाही. पण आता सुदैवाने त्याला ती संधी मिळाली. अमोल ना नगरसेवक, ना आमदार तर डायरेक्ट खासदार होणार असं मोठं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी केलं. आयुष्याच्या या टर्निंग पॉईंटवर मी त्याच्यासोबत (Amol Kirtikar) नाही याची खंत वाटते असंही ते म्हणाले. गजानन कीर्तिकर यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.


खासदारकीची निवडणुक लढतो म्हणजे निवडून आल्यावर अमोल खासदारच होणार ना असं गजानन कीर्तिकर म्हणाले. 


काय म्हणाले गजानन कीर्तिकर? 


ही निवडणूक अटीतटीची असून दोन पक्ष फुटल्यानंतरची निवडणूक आहे. जनमतानंतर खरा कोण आणि खोटा कोण हे दिसून येईल. दीड वर्षांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो. त्यावेळी माझे कुटुंबीय विरोध करत होते आणि मी एक वेगळं मत मांडत होतो. आता मी एकटा पडलो अशी खंत कीर्तिकरांनी व्यक्त केली. मुलासोबत टर्निंग पॉईंटला मी सोबत नव्हतो याची खंत वाटते असं ते म्हणाले. माझा फायदा रवींद्र वायकरांना व्हायला पाहिजे. 


महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील


राज्यात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी उमेदवार दिले आहेत ते पाहता महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळणार असल्याचा अंदाज गजानन कीर्तिकरांनी व्यक्त केला. 


अमोल ठाकरेंना सोडून जाणार नाही


अमोल कीर्तिकर हे निवडून आल्यानंतर भाजप- शिंदे गटात जातील असं वक्तव्य वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, अमोल ठाकरेंना सोडून जाणार नाही. त्याला जायचंच असतं तर त्याचवेळी आमच्यासोबत शिंदे गटात आला असता. एकनाथ शिंदे यांनी त्याला स्वतः सोबत येण्यास सांगितलं होतं. त्यावेळी वडील जर वेगळी भूमिका घेणार असतील तर त्याला काही विरोध नाही. पण ठाकरेंना सोडणार नाही असं त्याने त्याचवेळी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर अमोल हा ठाकरेंना सोडून जाणार नाही. 


अमोल कीर्तिकरच निवडून येणार, आईचा विश्वास


एकीकडे गजानन कीर्तिकरांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली असली तरी दुसरीकडे त्यांच्या पत्नी मेघना कीर्तिकरांनी मात्र अमोल कीर्तिकरांच्या मागे राहण्याचा निर्णय घेतला होता. काही झालं तरी अमोल कीर्तिकरच निवडून येणार असा ठाम विश्वास त्यांनी मतदान झाल्यानंतर व्यक्त केला होता. 


मुंबईतल्या उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटानं अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात त्यांचे वडील आणि शिंदे गटामध्ये गेलेले गजानन कीर्तीकर खासदार होते. पण त्यांनी ही निवडणूक लढवायचं नाही असं ठरवलं. वडील एका पक्षात आणि मुलगा प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार असा भेद कीर्तीकरांच्या घरात झाला होता.त्यामुळं अमोल कीर्तीकरांना निवडणूक लढवण्यापासून रोखू न शकलेले गजानन कीर्तीकर शिंदे गटात एकाकी पडल्याचं चित्र होतं. 


ही बातमी वाचा: