नागपूर :   सध्याची राजकीय स्थिती आणि भाजपसमोर निर्माण झालेलं राजकीय आव्हान बघता केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari)  आता विधानसभा (Vidhan Sabha Election)  प्रचारात काही अंशी अधिक भूमिका बजावावी अशी आग्रही मागणी केल्याची माहिती आहे. गडकरींचा विकासात्मक आणि तुलनेत मवाळ चेहरा तसंच मंत्री म्हणून केलेल्या कामासंदर्भात राज्यातल्या जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा पाहता गडकरी हे महाराष्ट्र भाजपच्या मदतीचे ठरतील असं संघाला (RSS)  वाटतंय. दरम्यान या संदर्भात भाजपकडून  (BJP) अजून अंतिम निर्णय झालेला नाही.  


 केंद्रातल्या मोदी सरकारमधील ज्या काही मोजक्या मंत्र्यानी स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.  नितीन गडकरी जे फक्त स्वतःच्या महाराष्ट्र राज्यापुरतं लोकप्रिय नाहीत, तर ज्यांची लोकप्रियता महाराष्ट्राच्या बाहेर आणि पक्षीय पातळीच्यावर आहे. त्याच नितीन गडकरी यांनी यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जास्त सक्रिय भूमिका बजवावी असं संघाला वाटतंय.  2014 नंतर गडकरी दिल्लीत आणि त्यांनी महाराष्ट्रात लक्ष घालायचे नाही अशी सीमारेषा पक्ष श्रेष्ठींनी घालून दिली होती.


गडकरी - फडणवीस कॉम्बिनेशन महाराष्ट्रात चालणार?


 राजकीय विश्लेषकांना ही विद्यमान राजकीय परिस्थितीत गडकरी यांचं महाराष्ट्रात जास्त सक्रिय भूमिकेत येणं आवश्यक वाटते.  राजकीय विश्लेषकांच्या मते गडकरी यांनी 2019  नंतर त्यांना महाराष्ट्राच्या दैनंदिन राजकारणापासून बाजूला ठेवले असले, तरी त्यांनी कधी ही महाराष्ट्रातील प्रचाराला नकार दिलेलं नाही. शिवाय मतदारांच्या ज्या समूहात भाजपला आजिबात मतदान मिळणार नाही, अशा वर्गात ही गडकरींची प्रतिमा इतर भाजप नेत्यांच्या तुलनेत चांगली आहे.  त्यामुळे त्याचा फायदा भाजपला मिळेलच. तर दुसऱ्या बाजूला भाजप पदाधिकाऱ्यांना ही गडकरी महाराष्ट्रात आवश्यक वाटतात.  गडकरी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आवश्यक ठिकाणी मार्गदर्शन करतात. मात्र, ते आताच्या तुलनेत जास्त सक्रिय झाले आणि गडकरी - फडणवीस असा कॉम्बिनेशन महाराष्ट्रात राहिला तर भाजपला त्याचा भरीव फायदा मिळेल असं भाजप पदाधिकाऱ्यांना वाटतंय.


 सामान्य मतदारांना खासकरून भाजपच्या विचारसरणीच्या मतदारांना ही महाराष्ट्राच्या बाबतीत गडकरींनी सक्रिय भूमिका बजवावी असा संघाचा सल्ला योग्य वाटतंय.  गडकरी यांची प्रतिमा विकास पुरुष आणि जात, धर्माच्या पलीकडची आहे. त्यामुळे गडकरींना महाराष्ट्रात जो पाठिंबा मिळू शकेल, तसा पाठिंबा भाजपच्या इतर कोणत्याही नेत्यांना मिळणार नाही असे सामान्य नागपूरकरांना वाटतंय.... 


भाजप काय रणनीती आखणार? 


 दरम्यान, संघाने विद्यमान राजकीय परिस्थितीत काय होणं आवश्यक आहे असा त्यांचा निरीक्षण जरी गडकरी आणि भाजपपर्यंत पोहोचवला असला, तरी यासंदर्भात अंतिम निर्णय भाजपलाच घ्यावा लागणार आहे.  तसेच केंद्रीय नेतृत्व जोवर तसा सिग्नल देणार नाही, तोवर गडकरी हे ही फारशी सक्रियता दाखवणार नाही असे राजकीय निरीक्षकांना वाटते. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनुषंगाने भाजप काय रणनीती आखते. आणि त्यामध्ये गडकरींची भूमिका काय असते यावरूनच महाराष्ट्राच्या बाबतीत संघाचा सल्ला भाजपने ऐकलं आहे की नाही हे स्पष्ट होईल. 


Video:  फडणवीस आणि गडकरी जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात दिसावी,  काय म्हणतात नागपूरकर?