RSS on Sharad Pawar : संघाचे मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर मधून भाजपला खडेबोल सुनावण्यात आले आहेत. संघाचे घाटकोपर विभाग संघचालक आणि स्तंभलेखक रतन शारदा यांच्या लेखात भाजप नेत्यांची कान उघडणी करण्यात आली आहे. राज्यात भाजप च्या झालेल्या घसरणीचे विश्लेषण यात करण्यात आले आहे. या लेखाची आज दिवसभर चांगलीच चर्चा रंगली आहे. हा लेख ज्यांनी लिहिला आहे त्या रतन शारदा यांच्याशी बातचीत केली आहे. 


राज्यात नंबर एकचा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली


"महाराष्ट्रात अनावश्यक राजकारण केलं गेलं. शिंदे- फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना आणि काहीही गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतलं गेलं, ते मतदारांना आवडलं नाही. शरद पवार दोन तीन वर्षात सक्रीय राजकारणापासून दूर सारले गेले असते. मात्र, अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे मेहनतीने राज्यात नंबर एकचा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली" असे म्हणत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्राने भाजपला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. 


संघाच्या मुखपत्रातून कोणते दावे करण्यात आले आहेत? 


(ऑर्गनायजर, लेखक- रतन शारदा, यांनी लिहिलेल्या लेखातील मुद्दे) 
2024 लोकसभेचा निकाल हा अतिआत्मविश्वास असलेल्या भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी रियालिटी चेक आहे.


सोशल मीडियावर पोस्टर्स आणि सेल्फी शेअर केल्याने निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी थेट मैदानावर उतरुन मेहनत घ्यावी लागते.


मोदींच्या नावावर निवडून येवू या भ्रमात सगळे होते, रस्त्यावर जनतेच्या मनात काय आहे याचा कानोसा घेतलाच नाही. संघाने भाजपचं काम केलं नाही या आरोपात तथ्य नाही. 1973 ते 1977 हा आणीबाणीचा काळ सोडला तर संघाने कधीच प्रत्यक्ष राजकारणात थेट भाग घेतला नाही. 2014 ला संघाने शतप्रतिशत मतदानासाठी प्रयत्न केले होते. मात्र यावेळी संघाने राष्ट्र बांधणी, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय विचारांना पाठिंबा मिळावा, लोकांनी मतदानाला बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केले.


10-15 लोकांच्या ग्रुपला एकत्र करुन मुद्दे समजावले, मुंबईत अशा 60 हजार पेक्षा जास्त तर दिल्लीत सव्वा लाख मीटिंग झाल्या. देशात अशा साधारण 20 लाख मीटिंग्ज संघाने घेतल्या असतील.


मात्र आयेगा तो मोदी या भ्रमात असलेल्या भाजपच्या लोकांनी संघाची मदत घ्यायचा प्रयत्न केला का हा सुद्धा प्रश्न आहे.


उमेदवारांची निवड चुकली, आयाराम गयाराम घेत त्यांना ऐनवेळी तिकीट देणं भोवलं. मोदीच 543 जागांवर लढतायत असं समजून मत द्या हा विचार मतदारांना पटला नाही.


भाजपचे नेते आमदार, खासदार, मंत्री जनतेला भेटत नव्हते, मतदारांशी संपर्क तुटला होता.


हिंदू धर्माचा, रामाचा अपमान करणाऱ्यांचं भाजपने वाजतगाजत स्वागत केलं तर नुपूर शर्मा सारख्यांना कठोरपणे जाहिरपणे फटकारले गेले त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी झालं.


महाराष्ट्रात अनावश्यक राजकारण केलं गेलं. शिंदे- फडणवीस सरकारकडे स्पष्ट बहुमत असताना आणि काहीही गरज नसताना अजित पवारांना सोबत घेतलं गेलं, ते मतदारांना आवडलं नाही. यामुळे मेहनतीने राज्यात नंबर एकचा पक्ष बनलेल्या भाजपची ब्रँड व्हॅल्यू घसरली.शरद पवार दोन तीन वर्षात सक्रीय राजकारणापासून दूर सारले गेले असते.


अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील अंतर्गत भांडणातच राष्ट्रवादीची सगळी शक्ती खर्च झाली असती.. दादांना सोबत घेण्याचं चुकीचं पाऊल का उचललं गेलं? 


ज्यांनी 26-11 हे संघाचं कारस्थान म्हंटलं, संघाला अतिरेकी संघटना म्हंटलं, हिंदूंचा छळ केला, भगवा दहशतवाद शब्दांना प्रोत्साहन दिले,अशा काँग्रेस नेत्यांना भाजपने पक्षात घेतल्याने संघाला मानणारा वर्ग खूप दुखावला गेला. भाजपच्या नेत्यांनाच खरं राजकारण कळतं आणि संघाच्या लोकांना नाही हा खोटा अहंकार भोवला.


इतर महत्वाच्या बातम्या 


''बप्पा, मी फोन ऑपरेटर बनल्यावर कॉल डिटेल्सपण बाहेर येतील''; बजरंग सोनवणे अन् मिटकरींमध्ये जुंपली