Dharashiv crime: बीड आणि सांगलीनंतर आता धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? असा सवाल धाराशिव मधील पवनचक्की कंपनीत झालेल्या तोडफोडीनंतर आमदार रोहित पवारांनी केलाय. महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी केलाय. X माध्यमावर ट्विट करत त्यांनी या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली. 

महाराष्ट्राचा गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही ? असा सवाल आमदार रोहित पवारांनी केलाय. खंडणीसाठी धाराशिवच्या भूम तालुक्यात पवनचक्की माफीयांचा धुमाकूळ सुरू असून तलवारी, लोखंडी साखळ्या, धारदार शस्त्रांनी पवनचक्की कंपनीतील वाहनांची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली होती. 

रोहित पवारांची पोस्ट नेमकी काय ?

'महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होत असून पूर्वी पुण्यात दहशत माजवणाऱ्या एका आकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट धाराशीवपर्यंत मजल मारलीय.. त्याच्या टोळीने धाराशीवमध्ये पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून धुमाकूळ घातलाय आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करून प्रचंड दहशत माजवलीय. त्याच्या दहशतीमुळं कुणी तक्रार करायलाही पुढं येत नाही.

बीड आणि सांगलीनंतर आता धाराशीवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? आणि गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही? 

मुख्यमंत्री महोदय, पुलीस की इज्जत का सवाल है!कधी आवळताय या नवीन आकाच्या मुसक्या? '

नेमकं काय घडलं होतं?

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूडजवळील दुधोडी फाटा येथे खाजगी पवनऊर्जा प्रकल्पावर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पवनचक्की कंपनीच्या अकरा वाहनांची तोडफोड करण्यात आली असून, काही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हल्लेखोरांच्या हातात तलवारी, लोखंडी साखळ्या, लाठ्या असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. खंडणीसाठी हा हल्ला झाल्याचं बोललं जातंय. मात्र पवनचक्की व्यवस्थापकाडुन कोणावरही गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खंडणी गोळा करणाऱ्याना राजकीय वरदहस्त असल्याने कंपनी व्यवस्थापन पुढे येत नसल्यासही बोलले जाते.

हेही वाचा

क्लासमधलं किरकोळ भांडण पालकांनीच नेलं विकोपाला, दुसऱ्या मुलीच्या घरात घुसून काळं निळं होईपर्यंत बेदम मारहाण, महिलेसोबत घाणेरडं वर्तन