Eknath Khadse on Girish Mahajan : हनी ट्रॅप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अटकेत असलेल्या प्रफुल लोढावरुन (Praful Lodha) भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. यावरून गिरीश महाजन यांच्या मदतीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. एकनाथ खडसे हा मात्तबर नेता होऊ शकत नाही तो भिकारी नेता आहे. अर्धवट माहितीच्या आधारे नेत्यांची बदनामी करत आहे. जिल्ह्याचे नाव ते बदनाम करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केलाय. आता यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना खुलं आव्हान दिलं आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, मला या आमदारांवर फार बोलायचे नाही. कारण हे आमदार मीच घडवलेले आहेत. त्यांची पत्रकार परिषद झाली. पण राज्यभर जो विषय चालला आहे तो हनी ट्रॅपचा आणि प्रामुख्याने प्रफुल लोढाचा. त्या संदर्भात एकही शब्द ते बोलले नाहीत. फक्त नाथाभाऊला टार्गेट करत बसले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप माझ्यावर केला. माझ्या चारित्र्यावर आरोप केला. मी 45 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे. गिरीश महाजन म्हणतात मी 35 वर्षापासून आमदार आहे. मी 36 वर्षात आहे. गिरीश महाजन हे अर्ध्या खात्याच्या मंत्री आहेत. मी 18 खात्यांचं कॅबिनेट मंत्रीपद भोगलं आहे. गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत. त्यांना पूर्ण खात सुद्धा मिळालं, असा टोला त्यांनी गिरीश महाजन यांना लगावला.
प्रफुल लोढाने गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं?
मी मंगेश चव्हाण यांना आव्हान करतो की, माझ्याविषयी एक छोटीशी गोष्ट जरी तुमच्याकडे असेल तरी ते समाजासमोर दाखवा. नुसत्या गप्पा काय मारतात? मी राजकारणात निवृत्त होईल, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना दिले. मूळ प्रश्न प्रफुल लोढा आणि गिरीश महाजनचा आहे. गिरीश महाजन यांचा नाव वारंवार महिलांसंदर्भात का येते? प्रफुल लोढाने गिरीश महाजन यांच्या संदर्भात म्हटले की, माझ्याकडे त्यांच्या बाबतचे सर्व पुरावे आहेत. मी बटन दाबलं तर हिंदुस्तान मे तहलका मचेगा, असे त्यांचे शब्द आहेत माझे नाही. प्रफुल लोढाने गिरीश महाजन यांचंच का नाव घेतलं? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रफुल लोढाची नार्को टेस्ट करा
गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहे, असा आरोप अनिल थत्ते नावाच्या पत्रकाराने केला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना अंकल म्हटले होते. प्रफुल लोढा हा तुमच्या ताब्यात आहे. प्रफुल लोढाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. प्रफुल लोढाची नार्को टेस्ट करा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
माझ्या मुलाच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा
गिरीश महाजन यांनी माझ्या मुलाच्या प्रकरणात ही आत्महत्या आहे की हत्या आहे, असे प्रश्न उपस्थित केले. मी आजही गिरीश महाजन यांना सांगतो मला खालच्या स्तरावर बोलता येत नाही. तुम्ही वारंवार माझ्या मुलाच्या संदर्भात खोटं बोलतात. तुला खोटं बोलण्याची सवय आहे. तुझ्यात ताकद असेल तर मुलाच्या प्रकरणात सीबीआयची चौकशी करा, असे आव्हान एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिले.
तुमच्या संपत्तीचे पुरावे देतो, चौकशी करणार का?
माझ्या चारित्र्यावर बोलले. मी गुलाबी गप्पा केलेल्या नाहीत. माझ्या मुलींशी गप्पा केलेल्या आहेत. दुसऱ्या मुलींशी दुसऱ्याच्या बायकोशी गप्पा केलेल्या नाहीत. तुम्ही कसल्या गप्पा केलेल्या आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे. माझी आत्तापर्यंत पाच वेळा प्रॉपर्टीची चौकशी झाली आहे. सर्व प्रॉपर्टी कायदेशीर आहे, असे मला सर्टिफिकेट मिळाले आहे. तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि तुम्ही सरकारला सांगा नाथाभाऊंचे आव्हान मी स्वीकारले आहे. माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा. दूध का दूध पाणी का पाणी आहे होऊन जाऊद्या, असे आव्हान देखील एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिले आहे. आता एकनाथ खडसे यांच्या पत्रकार परिषदेनंतर गिरीश महाजन काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा