मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत माझं फोनवर बोलणं झालं असून महायुतीचे केंद्रातील हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदासाठी जे नाव सुचवतील त्या नावाला माझा व शिवसेना पक्षाचा पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. त्यामुळे, मुख्यमंत्री आता भाजपचाच होईल, असे दिसून येत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संख्याबळावर भाष्य करत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नसल्याचे म्हटले. तसेच, अजित दादांना Ajit pawar) मुख्यमंत्री करा, असं म्हणणाऱ्या रोहित पवारांना (Rohit Pawar) टोलाही लगावला. राज्यात 23 तारखेला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला, महाराष्ट्राने आजपर्यंत कधीच असा निकाल दिला नव्हता. काँग्रेसचा विक्रम मोडला गेला, त्याबद्दल सर्वांचे आभार. आता, आमच्यावर जबाबदारी वाढल्याचं अजित पवारांनी म्हटलं.
उद्या मी, फडणवीस आणि शिंदे दिल्लीला जाणार आहोत, दिल्लीला गेल्यानंतर आमची पुढची चर्चा होणार आहे. त्यानंतर नवीन मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल. नागपूरचं अधिवेशन आहे, पुरवण्या मागण्या मान्य कराव्या लागतील. कामाचं प्रेशर राहणार आहे. आमचा अनुभव असल्यामुळे अडचणी येथील असं मला वाटत नाही. सर्व समाजाला सोबत नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही अजित पवारांनी म्हटंल. उद्या दिल्लीला गेल्यानंतर लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे मी प्रमुखांना पण भेटणार आहे. खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचं सरकार स्थापन होईल, असेही अजित पवारांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी काय करावं, त्यांच्या वाट्याला किती जागा येतील, किती पदे येतील त्याबाबत सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. आमच्या बाजूचा निर्णय आम्ही घेऊ त्यांच्याबाबतचा निर्णय मी कसा सांगणार?, असा सवालही अजित पवारांनी विचारला. तर, कार्यकर्त्यांच्या भावनांवर बोलताना, कार्यकर्त्यांना काही जरी वाटत असलं तरी प्रत्येकाची संख्या किती आली? किती लोक निवडून आले हे पाहिलं जातं. मागच्या अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली. तसेच, नव्या सरकारचा शपथविधी महिन्याच्या शेवटी 30 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटलं.
रोहित पवारांना टोला
आत्ताच अजित दादांना मुख्यमंत्री करा, असे रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यावर, बाकीच्यांनी फुकटचा सल्ला द्यायची गरज नाही आम्ही आणि आमचा पक्ष, आमदार कार्यकर्ते थांबलेले आहेत असा पलटवार अजित पवारांनी पुतण्यावर केला आहे.
कोणीही माझ्या संपर्कात नाही
निकाल लागून फक्त तीन दिवस झाले आहेत, अजून कशातच काही नाही. मात्र, काही पण बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्या संपर्कात कोणीही नाही, निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेतली, त्यात आमच्या पराभूत आमदारांचा देखील समावेश होता. त्यांचे मन जाणून घेतलं, तसेच निवडून आलेल्या आमदारांना मतदारसंघात जाऊन जनतेचं आभार मानायचं सांगितल्याचेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं