Rohit Pawar on Maratha Reservation GR : मराठा आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयानंतर, मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण करत असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आणि सरकारच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं. मात्र दुसरीकडे, या निर्णयाला आता ओबीसी समाजातील नेत्यांकडून तीव्र विरोध सुरू झाला आहे. विशेषतः राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आगामी काळात राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.
रोहित पवार म्हणाले की, मराठा समाजाचे आंदोलन होणार हे सरकारला तीन महिने आधी माहीत होतं. होम डिपार्टमेंटला किती लोक येणार याचा अंदाज होता. आझाद मैदानापर्यंत आंदोलन पोहोचले हे चांगली गोष्ट आहे. आंदोलकांना काही सुविधा मिळाल्या नाहीत हे दुर्दैव आहे. आंदोलन हाताबाहेर गेले हे त्याचंच कारण आहे. कोर्टाने यात लक्ष घातले आणि त्यानंतर समितीने चर्चा करायला सुरुवात केली. लोक येणार होते तर आधीच का तयारी केली नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का?
रोहित पवार पुढे म्हणाले की, मुंबईकरांना अडचण होईल आणि त्यावर प्रश्न उपस्थित होऊन मुंबई महापालिकेत भाजपला फायदा होईल असे वातावरण तयार केले गेले. गिरीश महाजन हे समितीत होते, ते ओबीसी नेते आहेत. सर्वांना मान्य असणारा GR काढला तर हा ओबीसींचा वाद का? सरकारमध्ये एक मत नाही का? छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का? लोकसभेच्या आधी हा निर्णय का नाही घेतला? लोकसभा, विधानसभा निवडणुकानंतर हे सुरू ठेवले. मराठा आरक्षणाचा जीआर काढला आणि लगेच ओबीसी समिती नेमली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा वाद तुमचा सुरूच असणार आहे का? मराठा-ओबीसी वाद सुरू झाला आहे. यात सरकारकडून आगीत तेल टाकून वाद वाढवण्याचे काम सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
आणखी वाचा