पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. "मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे, तुम्ही दहा टक्के मतांच्या बेरजेसाठी या गोष्टी करत असाल तर 50 टक्के मतं वजा झालेली असतील. तुमचा डीएनए ओबीसीचा आहे असं सांगितलं, मात्र तो दिसून येत नाही," अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. हाके यांनी स्पष्ट केलं की हे प्रकरण कोर्टात जाणार असून, सुनावणी सुरू होईपर्यंत पंचायतराज निवडणुका होतील. "हे सगळं निवडणुकीसाठी केलं जात आहे का? या जीआरला तातडीने स्थगिती मिळाली पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
आमचं मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न
धारूरमधील सभेतील गोंधळावर बोलताना हाके म्हणाले, "ओबीसी आरक्षण बचावासाठी आम्ही राज्यभर यात्रा काढत आहोत. मात्र सभास्थळी आमचे बॅनर फाडले जात आहेत. तरीसुद्धा आम्ही सभा घेणार आणि यात्रा काढणारच. धारूरमध्ये गोपीनाथ मुंडे आणि भगवान बाबांचे फोटो असलेल्या कमानीचे बॅनर फाडण्यात आले. आमचं मॉरल डाऊन करण्याचा, आमचं बोलणं बंद करण्याचा हा प्रयत्न आहे." त्यांनी आरोप केला की, "झुंडशाहीच्या जोरावर सरकारकडून कागदाचा काळं-पांढरं करण्याचा प्रयत्न होत आहे. पण या जीआरचा लीगल ऍस्पेक्ट काय आहे, कोर्टात काय होणार हे मला नीट माहिती आहे."
मराठा समाजाला मुख्यमंत्री पदाचं श्रेय देणाऱ्या जाहिरातीवर हाके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, "श्रेय कोणी काय घ्यायचं ते त्यांना लखलाभ असो. मात्र ओबीसीचे आरक्षण संपले, त्यांच्या अन्नात माती कालवली गेली हे सत्य आहे." ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरवरून त्यांनी हल्लाबोल केला. "वंचित-शोषितांच्या प्रतिनिधित्वासाठी शाहू, फुले, आंबेडकरांनी लढा दिला. जर निवडणुकीत आपल्या पक्षासाठी, आमदार-खासदारासाठी श्रेय घेणार असतील, तर अठरापगड जातींचं हे दुर्दैव आहे," अशी टीका त्यांनी केली.
हाके पुढे म्हणाले, "निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमचं आरक्षण उध्वस्त करणार असाल, तर तुम्हाला कसं उध्वस्त करायचं हे इथले ओबीसी ठरवतील." त्यांच्या या विधानामुळे राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
ओबीसी आरक्षण बचावासाठी आम्ही राज्यभर यात्रा
धारूर सभा बॅनर फाडण्याबाबतच्या प्रकरणावर बोलताना हाके म्हणाले,ओबीसी आरक्षण बचावासाठी आम्ही राज्यभर यात्रा काढणार आहोत त्यासाठी सभा घेत आहोत. मात्र आमच्या सभेच्या ठिकाणचे बॅनर फाडले जात आहेत, परंतु तरीही आम्ही या सभा घेणार आणि आरक्षण बचाव यात्रा काढणार. या जीआरबाबत किंवा ओबीसीच्या बाजूने आमदार खासदार बोलायला तयार नाहीत. मी जिथे जिथे जातोय तिथे हल्ले होत आहेत. धारूरमध्ये सभेच्या ठिकाणी गोपीनाथ मुंडे, भगवान बाबा यांचे फोटो असलेली कमानीचे बॅनर फाडण्यात आला आहे. आमचं मॉरल डाऊन करणे, लक्ष्मण हाकेचे बोलणे बंद पाडणे यासाठी ही माणसं आता मुद्द्यावरून मुद्द्यावर आली आहेत.
झुंडशाहीच्या जोरावर यांनी शासनाकडून कागदाचा काळं पांढरं करण्याचा प्रयत्न केला आहे. या जीआरचा लीगल ऍस्पेक्ट काय आहे तसेच कोर्टात या जीआर बाबत काय होणार हे मला माहिती आहे, असंही हाकेंनी म्हटलं आहे.
इंदापूर लक्ष्मण हाकेंना लयं महत्त्व देऊ नका- मंत्री भरणे
राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा आदेश काढल्यानंतर ओबीसी समाजाकडून आंदोलन केलं जातंय. बारामतीत ओबीसींचा एल्गार मोर्चा पार पडलाय, राज्य सरकारने ओबीसी वरती अन्याय केलाय असा आरोप लक्ष्मण हाकेंकडून केला जातोय.यावर मंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रतिक्रिया विचारली असता लक्ष्मण हाके यांना लय महत्त्व देऊ नका असं मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटल आहे. मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजावर अन्याय होणार नाही, याबाबतीत राज्य सरकार काळजी घेईल. सर्वांचं रक्त लाल आहे काही लोक समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शासन दोन्ही समाजाला सारखाच न्याय देईल. असंही भरणे यांनी म्हटलं आहे.