Sanjay Raut on Raj Thackeray and Uddhav Thackeray : यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) देखील उपस्थित राहू शकतात, असे संकेत ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी दिले. सचिन अहिर यांनी शनिवारी ‘एबीपी माझा’च्या न्यूजरूममधील गणेशमूर्तीचं दर्शन घेतलं. यावेळी दिलेल्या छोटेखानी मुलाखतीत त्यांनी "यंदाच्या दसऱ्याला एक चांगली बातमी मिळू शकते. कदाचित आमच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रण दिलं जाऊ शकतं, " असे वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

संजय राऊत म्हणाले की, दसरा मेळाव्यात एकत्र येण्याबाबत मला माहित नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंचा गुढीपाडव्याला दुसरा वेगळा मेळावा असतो. आमचही विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे तसं होणं शक्य नाही. दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात.  भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येऊन आमची सहमती झाली आहे. साठ वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता संजय राऊत यांनी फेटाळली.

काय म्हणाले होते सचिन अहिर? 

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणं ही केवळ दोन पक्षांची नव्हे, तर राज्याच्या हिताची गरज आहे. हे जनतेच्या मनातील बोलके प्रतिबिंब आहे, असं मत व्यक्त केलं. गणेशोत्सवाच्या समारोपानंतर आता पितृपक्ष सुरू होणार असून, त्यानंतर येणाऱ्या दसऱ्याला "चांगली बातमी मिळेल," अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, दसरा मेळाव्यात आमचे नेते सद्यस्थितीचा आढावा घेतील आणि भविष्यातील दिशा कार्यकर्त्यांना देतील. त्यामुळे हा मेळावा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ नेहमीच एकमेकांकडे लक्ष ठेवून असतात. दोघे दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का, याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. मात्र, आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही," असंही अहिर म्हणाले. "जसं आमचं स्वतंत्र दसरा मेळाव्याचं व्यासपीठ असतं, तसं त्यांचंही असतं. त्यामुळे तेही आम्हाला आमंत्रित करू शकतात," असे देखील सचिन अहिर यांनी म्हटले होते. 

आणखी वाचा 

Omraje Nimbalkar VS Ranajagjitsinha Patil: नादी लागू नको माझ्या तूला चांगलाच रडवीन...; गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे अन् आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुत्र आमनेसामने