Ram Shinde on Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके यांनी आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्या गाडीचं स्टेअरिंग पकडलं होतं. त्यानंतर काल राम शिंदे यांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात जाऊन निलेश लंके (Nilesh Lanke) यांचे विरोधक विजय औटी यांच्या गाडीचं स्टेअरिंग पकडलं. तेव्हापासूनच रोहित पवारांनी वचपा काढला, अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत राम शिंदे यांना विचारलं असता त्यांनी रोहित पवारांचा चांगलाच समाचार घेतला. रोहित पवारांनी परतफेड केली नाही तर, कॉपी करून पास व्हायची सवय लागली आहे. आम्ही ओरिजिनल अभ्यास करून पास झालो आहोत, आधी लंके यांनी माझ्या गाडीचं स्टेअरिंग धरलं आणि त्याची कॉपी रोहित पवारांनी केली, अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. 


अहमदनगर येथील भाजप आमदार राम शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी दिवाळी फराळ पारनेरचे राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी उपस्थिती लावून राम शिंदे यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. मागील काही दिवसांपासून आमदार राम शिंदे आणि निलेश लंके यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. जिल्ह्यातील भाजप अंतर्गत विखे आणि शिंदे यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच कट्टर विरोधक असलेले निलेश लंके आणि राम शिंदे यांच्या भेटीगाठी आणि दिवाळी फराळ कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानं पुन्हा चर्चांना उधाण येणार आहे. 


दरम्यान राम शिंदे पालकमंत्री असताना मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत होतो. त्यावेळी माझा पक्ष न पाहता त्यांनी मला कायम मदत केली आहे. तेच ऋणानुबंध मी पाळत असून मध्यंतरीच्या काळामध्ये पक्षीय पथ्य पाळावं लागले. आता मात्र महायुती असल्यानं आता चांगलं झालं असल्याचं आमदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे. याच फराळ कार्यक्रमासाठी राम शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना देखील आमंत्रण दिलं आहे. पार्थ पवार यांनी आमंत्रण स्वीकारत फराळाच्या कार्यक्रमाला येणार येणार असल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.


पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या विविध कोट्यवधींच्या विकासकामांचं आज भूमिपूजन पार पडणार आहे. ही कामं रोहित पवार यांनी मंजूर केला असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मात्र, या कामाचे महविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये असताना तत्कालीन राज्यमंत्री मंत्री अदिती तटकरे यांनी शुभारंभ केला होता. पुन्हा त्याच कामाचं भूमिपूजन करून बालिशपणाचा कळस आमदार रोहित पवार गाठत असून किती खोटं बोलावं याला परिसीमा असतात. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत हे दिसून आलं असून रोहित पवार यांच्या गटाचा संपूर्ण तालुक्यात धुव्वा उडवला असल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.