Raver Lok Sabha Constituency : जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुन्हा एकदा रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या विरोधात सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) किंवा नणंद रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र एकनाथ खडसे यांनी तब्येतीचे कारण देत आणि रोहिणी खडसे यांनी विधानसभा लढवणार, असे म्हणत लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. 


यानंतर एकनाथ खडसे यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीच टीका करत घरचा आहेर दिला होता. पक्ष अडचणीत असताना त्यांनी आपल्या मुलीला उमेदवारी देऊन साथ द्यायला पाहिजे होती. मात्र, आपल्या सुनेला सोयीचे होईल, अशी भूमिका एकनाथ खडसेंनी घेतली, अशी टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार गट महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 


रक्षाताईंनी माझ्या आईच्या विरोधात प्रचार केला 


रोहिणी खडसे म्हणाल्या की, मी माझ्या पक्षाच्या विचारधारेला बांधील आहे. मी ठामपणे आमचा उमेदवार निवडून आणेल. रक्षा खडसे या वेगळ्या पक्षात आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार केला आहे. आमच्या पक्षाचा प्रचार आम्ही केला आहे. रक्षाताईंनी माझ्या आईच्या विरोधात दूध संघाच्या निवडणुकीत प्रचार केला होता, असे त्यांनी म्हटले आहे. 


आम्ही आमच्या विचारधारेला बांधील


त्या म्हणाल्या की, प्रत्येक निवडणुकीत रक्षा खडसेंनी आमच्या विरोधातच प्रचार केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या विचारधारेला बांधील आहोत. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार रावेर लोकसभेतून प्रचार करणार आणि निवडूनही आणणार आहे, असे आव्हान त्यांनी रक्षा खडसेंना दिले आहे.  


रावेर मतदारसंघाबाबत एकनाथ खडसेंचा दावा


रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, सामना चुरशीचा आहे. रावेरमध्ये 7 ते 8 जण इच्छुक आहेत. काही उमेदवारांची छाननी करण्यात आली आहे. आम्ही तोडीस तोड उमेदवार देणार आहोत. रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिंकणार आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या


मोठी बातमी : अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला तगडी फाईट देणार?


Anna Hazare : दारुची नीती केली, शेवटी त्या नीतीमुळेच त्याला अटक झाली, केजरीवालांच्या अटकेवर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया