जळगाव : एकीकडे एकनाथ खडसे (Eknath Khadse) भाजपमध्ये जाणार अशा चर्चा असताना त्यांची कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्याचं दिसतंय. कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नाही, भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला प्रदेशाध्यक्ष असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असंही रोहिणी खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे. 


लवकरच राज्यभरात महिला मेळाव्यांचे आयोजन करत झंजावती दौरा करणार असल्याचं रोहिणी खडसे यांनी माहिती दिली. लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी महिलांची सक्षम ताकद उमेदवारांच्या पाठीमागे उभी करणार असल्याची भूमिका रोहिणी खडसे यांनी घेतली आहे. 


 






एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार


राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. येत्या 9 किंवा 10 एप्रिल रोजी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रोहिणी खडसे काय करणार याची उत्सुकता होती. आता रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यावर स्पष्टीकरण दिलं असून आपण शरद पवारांच्या सोबतच राहणार असल्याचं सांगितलं आहे. 


एकनाथ खडसे हे 2014 मध्ये मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक होते. पण पक्षाने त्यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपद दिलं. त्यामुळे नाराज झालेले खडसे विरुद्ध फडणवीस असा भाजपमध्ये संघर्ष सुरु झाला. पुढे खडसेंवर भोसरी एमआयडीसीतल्या जमीन घोटाळ्याचे आरोपही झाले. अखेर पक्षांतर्गत संघर्ष टोकाला गेल्यावर खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांना विधानपरिषदेवर घेण्यात आलं. त्याचसोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची संधी देण्यात आली.


दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून रावेरमधून त्यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता खडसे हे पुन्हा भाजपसोबत येत असल्याने उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे. 


ही बातमी वाचा: